शिवसेनेच्या खासदारांनाही हवी भाजपसोबत युती

शिवसेनेच्या खासदारांनाही हवी भाजपसोबत युती

काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर केलेल्या आघाडीवर शिवसेनेच्या खासदारांनीही नाराजी दर्शवली असताना नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील भाजप बरोबर नैसर्गिक युती करावी असे मत व्यक्त केले आहे. दिल्ली येथे झालेल्या खासदारांच्या बैठकीस अर्थात स्नेहसंमेलनास आपण देखील उपस्थित होतो, अशी प्रांजळ कबुली खा. गोडसे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांच्या दरम्यानची लढाई आता दिल्लीत पोहचल्याचे दिसून येते. आमदारांनंतर आता सेनेच्या खासदारांनाही भाजप सोबत युती हवी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला स्नेहसंमेलन असे संबोधण्यात येत असले तरी, लवकरच सर्व खासदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे समजते.

शिवसेनेकडे आताच्या घडीला लोकसभेत 18 खासदार आहेत. मात्र शिंदे गट वेगळा झाल्यानंतर आणि भाजप बरोबर सत्तास्थापन केल्यानंतर 10 ते 12 शिवसेना खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना खासदारांमधे नाराजीची चर्चा असताना शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करावे असे म्हटले आहे. कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. एकंदरित भाजपसोबत या हे पत्रात अप्रत्यक्षपणे नमूद केल्याची चर्चा आहे. त्यामुळें गवळी यांच्यासह काही खासदारांनी भाजपसोबत जुवळून घ्या अशी इच्छा उद्धव ठाकरेंसमोर ही व्यक्त केल्याचे समजते. यासंदर्भात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. शिवसेना भाजप ही नैसर्गिक युती कायम राहावी हा आमच्या सर्व खासदारांचा प्रयत्न आहे. भाजपने देखील एक पाऊल मागे यावे असेही ते म्हणाले.

नैसर्गिक युती कायम राहावी
शिवसेना हा एक परिवार आहे. हा संपूर्ण परिवार एकत्र राहावा ही सर्वच खासदारांची इच्छा आहे. आमची नैसर्गिक युती ही भाजपबरोबर होती ती कायम राहावी. ही युती पुन्हा व्हावी अशी सर्व खासदारांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे शिवसेनेला अडचणी निर्माण होतील. महाविकास आघाडीतून लढायचे ठरल्यास सिन्नर, नाशिक, इगतपुरी या ठिकाणी शिवसेनेची भूमिका काय असेल हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे भाजपसोबत पुन्हा एकदा युतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यापूर्वी सर्व खासदारांनी पक्षप्रमुखांशी चर्चा केली आहे. आम्ही आजही उध्दव साहेबांसोबत आहोत. परंतु हा परिवार एकत्र असावा यासाठी सर्वच खासदारांचे प्रयत्न आहेत.
खासदार हेमंत गोडसे, नाशिक

उद्या बैठक
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भुमिका ठरविण्याबाबत सोमवारी मातोश्री येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आले आहे. याबैठकीत भाजपसोबत युती करण्याबाबतचा प्रस्ताव सर्व खासदारांकडून पक्षप्रमुखांसमोर मांडण्यात येणार असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे.

First Published on: July 10, 2022 2:00 AM
Exit mobile version