‘पळपुटे कोण?’; शिवसेनेचा शरद पवारांना सवाल

‘पळपुटे कोण?’; शिवसेनेचा शरद पवारांना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि भाजप पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे स्वत: शरद पवार यांनी राज्यभर दौरा करुन कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेने शरद पवार यांना प्रश्न विचारले आहेत. ‘स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?’, असा प्रश्न शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांना विचारला आहे.


हेही वाचा – साहेब टायमिंगच्या शोधात?


 

‘पवारसाहेबांचे सोनियांसोबत राजकीय गुप्तगू’

शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय गुप्तगू सुरु आहे. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत असाल ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.


हेही वाचा – कोकणात कमळाबाईक इचारता कोण…


 

‘डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेचेच पार्सल’

अग्रलेखात शिवसेनेने डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर देखील टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व तो तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही. खरेतर स्वाभिमान हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये’, असे शिवसेनेने म्हटले आहे.

First Published on: September 17, 2019 10:49 AM
Exit mobile version