Shiv Sena UBT vs BJP : ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा… ठाकरे गटाची भाजपावर टीका

Shiv Sena UBT vs BJP : ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा… ठाकरे गटाची भाजपावर टीका

मुंबई : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी भारतीय जनता पक्षाच्या वागणुकीबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी (Shiv Sena UBT vs BJP) संबंध तोडले ते याच ‘सापत्न’ वागणुकीच्या मुद्द्यावर. गरज सरो वैद्य मरो हेच भाजपाचे काम व ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा खेळ खल्लास करायचा हेच त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वाभिमानी बाण्याने भाजपापासून लांब जाणे पसंत केले, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर शरसंधान केले आहे.

शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी झालेली दिसते. जो येतोय तो या कुत्र्याच्या पेकाटात लाथ मारीत आहे. ‘आम्हीच शिवसेना’ असा विकतचा दावा करणाऱ्या गटाचे ज्येष्ठ पुढारी गजानन कीर्तिकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वागणुकीबाबत उघड नाराजी व्यक्त केली. भाजपावाले आमच्याशी नीट वागत नाहीत, आम्ही त्यांचे सावत्र असल्याप्रमाणे वागवतात. ‘एनडीए’मध्ये आम्हाला सन्मान नाही वगैरे हुंदके कीर्तिकरांसारख्या पुढाऱ्यांस फुटावेत हे आश्चर्य आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

22 आमदार आणि नऊ खासदार शिंदे गटातून बाहेर पडणार?

कीर्तिकरसारख्यांना जे हुंदके फुटले त्यावर मिंधे गटाच्या प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे? भाजपासंदर्भात असे हुंदके फुटल्याने कीर्तिकरांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली की, हे तुमचे ज्येष्ठ पुढारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कच्छपी लागले? हे लोकांना कळले तर बरे होईल. पुन्हा मिंधे गटातील 22 आमदार आणि नऊ खासदारांची भाजपाच्या सापत्न वागणुकीमुळे कोंडी होत आहे. ते सगळे मिंधे गटातून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत आहेत, अशीदेखील माहिती समोर आली आहे. मोठमोठ्या गमजा मारीत या मंडळींनी गद्दारी करीत भाजपाशी हातमिळवणी केली होती. मात्र वर्षाच्या आतच त्यांचा बहुधा प्रेमभंग झाला आहे आणि घटस्फोटाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. खोक्यांनी स्वाभिमान आणि सन्मान विकत घेता येत नाही, हेच यातून पुन्हा सिद्ध झाले, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले ते याच ‘सापत्न’ वागणुकीच्या मुद्द्यावर. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान व स्वाभिमानाशी तडजोड करून भाजपाशी संसार चालवणे असह्य झाल्यामुळेच शिवसेनेस दूर व्हावे लागले. शिवसेनेचे जमेल तिथे खच्चीकरण करायचे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणणाऱ्या कारवाया गुप्तपणे करायच्या. चेहरा एक, तर मुखवटा वेगळाच. म्हणजे गाडी चालवायला ड्रायव्हिंग सीटवर बसायचे व अशा पद्धतीने अपघात घडवायचा की, ड्रायव्हर सुरक्षित राहून बाकी इतरांना राजकीयदृष्टय़ा ‘हे राम’ म्हणायला लावायचे. दिलेले शब्द पाळायचे नाहीत. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेस धड काम करू द्यायचे नाही. लोकसभा, विधानसभा जागावाटपाच्या वेळी कुरतडणे सुरूच ठेवायचे. केंद्रात तर शिवसेनेच्या वाट्यास नेहमीच बिनकामाचे अवघड मंत्रालय आले. हा सावत्रपणाच होता, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

आधी दाणा, मग कापती माना!

श्रीमंतांची गुलामी पत्करण्यापेक्षा आपली स्वाभिमानाची मीठ-भाकरी बरी हे धोरण अवलंबिले. भाजपास विरोधकांचे सोडाच, पण आपल्या मित्रांचे व सहकाऱ्यांचेही ‘हित’ बघवत नाही. शिंदे गटाच्या चाळीस कोंबड्या महाराष्ट्रात व 13 तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही. खुराड्यात आज दाणे घातले जात आहेत. आधी दाणा, मग कापती माना! कीर्तिकर यांनी ‘मान’ सांभाळावी! असा सल्ला ठाकरे गटाने दिला आहे.

शिंदे गटाला 13 जागा तरी मिळतील काय?

शिंदे गट म्हणतोय, आम्ही लोकसभेच्या 22 जागा लढवू. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी तेवढ्या जागा मागितल्या, पण भाजपा या गटास पाच-सात जागांचीदेखील भीक घालायला तयार नाही. शिंदे गटात 13 खासदार पळाले. त्यांना त्या 13 जागा तरी मिळतील काय? हाच प्रश्न आहे. शिंदे गटाने त्यांच्या मनातील घुसमट आणि खदखद आता बाहेर काढायला सुरुवात केली हे बरे झाले, पण सरकार चालविणाऱ्यांना या खदखदीचे काही सुख-दुःख आहे असे दिसत नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे ड्रायव्हर बनले आहेत. याचा सरळ अर्थ असा की, सरकारची सूत्रे भाजपाकडे आहेत व फडणवीसांच्या हातातील गाडीस ते कधी ‘अपघात’ घडवून शिंदे गटाची वाट लावतील हे सांगता येत नाही, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

लोकसभेतील 13 खासदारही अपात्र ठरतील!

खासदार कीर्तिकर यांनी आणखी एक हास्यास्पद दावा केला आहे. ते म्हणतात, ‘‘त्यांच्या गटाच्या लोकसभेच्या 22 जागा आहेत. त्यामुळे भाजपकडे आम्ही 22 जागा मागू.’’ हा दावा म्हणजे हास्यस्फोट आहे. चोरलेल्या शिवसेनेचा दावा भविष्यात टिकेल याची खात्री नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यात स्पष्टच म्हटले आहे, ‘‘विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही. विधिमंडळ पक्षाची नेमणूक मूळ पक्ष करतो. त्यामुळे मूळ पक्ष वेगळा. मूळ पक्ष हाच प्रतोद, गटनेता वगैरे नेमतो!’’ हा निकाल ज्यांना कळतो ते शेंबडं पोरही आता सांगेल की, शिवसेनेतून फुटलेले 40 आमदार व 13 खासदार हे अपात्र ठरणार आहेत! विधानसभेतील आमदारांचा निकाल तर लागतोच आहे, पण लोकसभेतील 13 खासदारही अपात्र ठरतील. त्यामुळे ‘13’ लोकसभा जागांवरही त्यांचा दावा राहणार नाही. याची खात्री असल्याने शिंदे गटास कीर्तिकर सांगतात त्याप्रमाणे सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे, असा दावा या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

संसदीय पक्षातला फुटीर गट म्हणजे शिवसेना नाही

कीर्तिकरांचा दुसरा विनोद असा की, ‘‘आमचे 18 खासदार निवडून आले, आम्ही 22 जागा लढलो.’’ कीर्तिकरांसारख्या जुन्या-जाणत्या पुढाऱ्याने तरी वस्तुस्थितीचे भान ठेवून बोलायला हवे. 13 खासदारांचा संसदीय गट हाच मुळी बेकायदेशीर ठरत आहे व निवडणूक आयोगाने शिवसेना व चिन्हाविषयी दिलेल्या एकतर्फी निर्णयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. खरी शिवसेना म्हणजे चोरीचा माल नाही. सत्याचाच विजय होईल व फुटलेले आमदार-खासदार वाऱ्यावर उडतील हे कायदेशीर चित्र आहे. फुटलेले 13 खासदार एकदम बाहेर पडले नाहीत. प्रत्येक जण स्वतंत्रपणे बाहेर पडला. त्यामुळे अपात्रतेबाबत त्यांचा खटला कायद्याच्या चौकटीत सोपा आहे व संसदीय पक्षातला फुटीर गट म्हणजे शिवसेना नाही यावर शिक्कामोर्तब होईल, असा दावाही ठाकरे गटाने केला आहे.

First Published on: May 30, 2023 8:48 AM
Exit mobile version