नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटणार, राणेंच्या चिवला बीचवरील ‘नीलरत्न’वर कारवाईचे आदेश

नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पेटणार, राणेंच्या चिवला बीचवरील ‘नीलरत्न’वर कारवाईचे आदेश

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मुंबई महापालिकेने राणेंच्या अधीश बंगल्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नारायण राणेंचा चिवला बीच चर्चेत आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर राणेंच्या असलेल्या नीलरत्न बंगल्यासंदर्भात आता काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चिवला बीचवरील त्याच बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिलेत. विशेष म्हणजे नारायण राणे केंद्रात मंत्री असताना केंद्रीय संस्थेनंच त्यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश दिल्यानं आता हा चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना नीलरत्न बंगल्यावरही कारवाईचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता नारायण राणेंच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

खरं तर नारायण राणेंनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मातोश्री दोनचं बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं. मुंबई महापालिकेकडून भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश बंगल्याला नोटीस बजावल्यानंतर राणेंनीही मातोश्री पार्ट 2 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता नारायण राणेंच्या मालवणमधील नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. विशेष म्हणजे हे आदेश राज्यातून नव्हे, तर केंद्रातून देण्यात आल्याने राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मालवणमधील चिवला समुद्रकिनार्‍यावर राणे कुटुंबीयांचा नीलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट 2021 मध्ये केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: February 21, 2022 6:50 PM
Exit mobile version