कर्जमाफी महाविकास आघाडीकडून; पण शिवसेना म्हणते “करून दाखवलं”

कर्जमाफी महाविकास आघाडीकडून; पण शिवसेना म्हणते “करून दाखवलं”

कर्जमाफीनंतर शिवसेनेची बॅनरबाजी

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने संयुक्तरित्या घेतलेल्या कर्जमाफी निर्णयाच्या श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. सरकार महाविकास आघाडीचे असतानाही शिवसेनेने ठाण्यात पोस्टरबाजी करून सरसकट कर्जमुक्तीचे फलक झळकवून आपणच करून दाखवलं असा दिंडोरा पिटण्यास सुरुवात केल्याने आघाडीत नवा वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या या पोस्टरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीसह मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोटो दिसत आहेत. तेव्हा,या कर्जमुक्तीची श्रेय काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळू नये. तसेच,पक्षवाढीसाठी फायदा व्हावा म्हणूनच जाणूनबुजून सहकारी पक्षातील नेत्यांना डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. “ज्या शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतचं सप्टेंबर २०१९ पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आले असून मार्च २०२० पासून ही योजना लागू होणार आहे.

एकीकडे या कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असताना शिवसेनेनेकडून मात्र,या कर्जमाफीची श्रेय लाटण्याचे उद्योग सुरु झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनीही असे श्रेय कुणी घेण्याची आवश्यकता नाही. हे महाविकास आघाडीचे काम असल्याचे स्पष्ट केले. तरीही, सेनेने ठाण्यातील नितीन जंक्शन येथील चौकात भलामोठा बॅनर लावून स्वतःचा दिंडोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. “सरसकट कर्जमुक्ती… करून दाखवलं”, असे लिहून शिवसेनेने पक्षाचे चिन्ह ठळक अक्षरात झळकावले आहे. त्यामुळे कर्जमुक्तीचा निर्णय तिन्ही पक्षांचा आणि सेना म्हणतेय आपण “करून दाखवलं” यावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: December 29, 2019 8:12 PM
Exit mobile version