बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवली? रोखठोकमधून शिंदे गटाला सवाल

बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवली? रोखठोकमधून शिंदे गटाला सवाल

मुंबई – शिंदे गटाच्या मदतीने मुंबई जिंकू, मुंबईवरील महाराष्ट्राचा आणि मराठी अस्मितेचा ठसा नष्ट करू याच मिशनसाठी अमित शहा मुंबईत आले. शिवसेनेची काही माणसे त्यांनी विकत घेतली, पण जनमत कसे विकत घेणार? शिंद्यांचे लोकही बाळासाहेबांना मानतात. जगात कोणीच अमर नाही. उद्या ‘वर’ गेल्यावर बाळासाहेबांना काय सांगणार? मुंबईचा सौदा करून भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला रसद पुरवून आम्ही मोठीच मर्दानगी केलीय, असे सांगणार आहेत का? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून विचारण्यात आला आहे.

अमित शहांचे वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्राने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मुंबईविरुद्ध मोठा कट असल्याने शिंदे गटावर फुले उधळली जात आहेत. हा महाराष्ट्राला धोका आहे. कधीकाळी रजनी पटेल यांनीही शिवसेनेस गाडण्याचा विडा उचललाच होता, पण त्यानंतर शिवसेना अनेक योजने पुढे गेली हा इतिहास आहे. शिवसेना संपवू अशी भाषा करणाऱ्या पटेलांची ‘तिरडी’च बांधू असे आव्हान तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. त्याच शिवसेनेचा वंश आज सर्वत्र आहे. शिंदे गट म्हणून मिरवणाऱ्यांना हे सत्त्व काय समजणार? अमित शहांच्या या महाराष्ट्रद्रोही वक्तव्यावरच शिंदे गटात बंड व्हायला हवे, पण लाचार आणि बेइमानांकडून स्वाभिमानाची अपेक्षा कशी करायची? असा प्रश्नही या लेखातून विचारण्यात आला आहे.

समान सत्तावाटपाचे काय?

“अमित शहा म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता. हा खुलासा त्यांनी अडीच वर्षांनंतर केला, पण समान सत्तावाटपाचे ठरलेच होते. तो शब्द कोणी फिरवला? अर्थात हातात ईडी, सीबीआय व इतर संस्था आहेत म्हणून सत्य बोलणाऱ्यांच्या बाबतीत ‘पटक देंगे’ची भाषा सहज वापरली जाते. ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’ असे बोलण्यापर्यंत मजल जाते, परंतु नियती रोज नवनवे डाव खेळत असते व राजकारणाचे चक्र हे खाली-वर होतच असते. आज पुन्हा महाराष्ट्राचे राजकारण अशा सीमेवर उभे आहे की, या राज्याच्या राजकारणामुळे देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकेल. शिंदे गट हा साबणाचा बुडबुडा आहे. शेवटी जेथे ठाकरे तिकडे शिवसेना हेच लोक मान्य करतील. आज सत्तापदे, मुख्यमंत्रीपद आहे म्हणून मुंगळे व माश्या गुळाभोवती आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, दिल्लीच्या आक्रमणाविरुद्ध एकत्र येऊन लढण्याचे ‘मिशन’ राखले तर महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत मोठा चमत्कार होईल. नितीश कुमार व यादवांनी उत्तरेचे राजकारण यशस्वी करावे, महाराष्ट्रात ठाकरे-पवारांनी लक्ष द्यावे. ते यशस्वी झाले तर बरेच साध्य होईल. भाजपचे ‘मिशन बारामती’चे प्रयोग अनेक वर्षांपासून चाललेच आहेत. ठाकरे-पवारांचे नेतृत्व राहूच नये यासाठी ही धडपड आहे. हा कृतघ्नपणाच आहे,” असंही या लेखातून मांडण्यात आलं आहे.

महाराष्ट्राविषयीचा द्वेष

राजकारणात व लोकशाहीत मतभेदांना जागा आहे. निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मऱहाठे’ त्यावर टाळय़ा वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत. पण ‘मऱ्हाठा’ नक्की उठेल!, असं आव्हान या मार्फत देण्यात आलं आहे.

First Published on: September 11, 2022 8:03 AM
Exit mobile version