सेनेचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात

सेनेचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेली असतानाच आता या बंडखोर आमदारांनी अपात्रतेच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाकडून रविवारी सर्वोच्च न्यायालयात एकूण २ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

यापैकी पहिली याचिका आमदार भरत गोगावले यांच्याकडून दाखल करण्यात आली असून त्यांच्याकडून अजय चौधरींच्या गटनेतेपदावर आक्षेप घेण्यात आला आहे, तर दुसर्‍या याचिकेतून शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळ असल्यामुळे अपात्रतेची कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी सायंकाळपर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे न्यायालयापुढे मांडायचे आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन १६ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी पिटीशन दाखल केली आहे. सोबतच नरहरी झिरवळ यांच्या विरोधातील अविश्वास ठरावही फेटाळला आहे. झिरवळ यांनी बंडखोर आमदारांना नोटीस पाठवून उत्तर देण्यासाठी २ दिवसांचा वेळ दिला होता. ही वेळ सोमवारी संपत असल्याने शिंदे गटाकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

First Published on: June 27, 2022 2:47 AM
Exit mobile version