Operation Kirit Somaiya : शिवसेनेला हवाय एक किरीट सोमय्या

Operation Kirit Somaiya : शिवसेनेला हवाय एक किरीट सोमय्या

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणे ही ज्या पद्धतीने लागोपाठ मांडली आहेत, त्यामुळे गेल्या काही दिवसात शिवसेना, कॉंग्रेस असो वा राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळ्याच सत्ताधाऱ्यांच्या पोटात एकच मोठा गोळा आला आहे. विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांच्या बाबतीत किरीट सोमय्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांचे यश हे अनेकांच्या मनात धडकी भरवणारे आहे. शिवसेनेतील नेते हे किरीट सोमय्यांच्या रडारवर आहेत. मग पक्षप्रमुखांपासून, नेत्यांसह ते प्रवक्ते संजय राऊतही सोमय्यांचे प्राईम टार्गेट आहेत. मग प्रताप सरनाईक असो वा भावना गवळी असो किरीट सोमय्यांनी केलेल्या खोदकामामुळे अनेकांचे धाबे दणादणले आहे. पण शिवसेनेत मात्र अशाच किरीट सोमय्यांची कमतरता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत सगळेच नेते भाजपला उत्तर देण्यासाठी किरीट सोमय्याच्या शोधात आहेत. शिवसेनेत अशाच किरीट सोमय्याची सध्या वाणवा आहे. त्यामुळे अनेकदा हाती धागेदोरे असूनही किरीट सोमय्यांसारखा हल्लाबोल करताना शिवसेना दिसत नाही.

शिवसेनेत अपवादात्मक स्थिती

शिवसेनेत सध्या एखाद दुसरा नेता सोडला तर पक्षाची बाजू तशी लावून धरणारा किंवा पक्षासाठी खिंड लढवणारा नेता शिवसेनेत शोधूनही सापडत नाही. शिवसेनेत सुभाष देसाईंचे संघटनात्मक कौशल्य लक्षात घेतले तर एका गोष्टीचा पाठपुरावा किंवा खोदकाम करण्यात त्यांचे कौशल्य आहे. मग निवडणुकीची यंत्रणा तयार करणे असो किंवा पक्षाचे संघटनात्मक काम करण्यासाठी मूर्त स्वरूप देणे असो ही जबाबदारी ते चोख पार पाडतात. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे नित्यनियमाने लावून धरतात. पण इतर कोणत्याही नेत्याला पक्षात अशा पद्धतीचे खोदकाम हे टीम फडणवीसांविरोधात करता आलेले नाही. त्यामुळेच शिवसेनेला असा किरीट सोमय्या सापडला तरीही पक्षा अशा व्यक्तीला वाव आणि राजकीय संरक्षण देणार का ? असा सवाल आहे. अशा व्यक्तीची पुढील परिस्थिती काय होणार हादेखील कळीचा मुद्दा आहे.

तोवर किरीट सोमय्याच रॉक करणार

केंद्रीय यंत्रणांकडे पाठपुरावा, भ्रष्टाचार खोदून काढणे, आयकर विभागातील दांडगा संपर्क आणि आर्थिक विषयातील उत्तम ज्ञान या किरीट सोमय्या यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळेच भावना गवळी आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मोर्चाबांधणी करणे किरीट सोमय्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये शक्य झाले. किरीट सोमय्यांसारखीच व्यक्ती ही शिवसेनाही सध्या शोधते आहे. त्यामुळे टीम फडणवीस यांच्या अशाच प्रकरणांची पोलखोल करण्याचे मनसुबे पूर्ण करणे शक्य होईल. पण जोवर अशा किरीट सोमय्याचा शोध लागत नाही, तोवर वारंवार अशा परिस्थितीला शिवसेनेला तोंड द्यावे लागणार आहे.

किरीट सोमय्यांचा परफॉर्मन्स 

शिवसेनेच्या नेत्यांमध्ये खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांपैकी असलेल्या पुण्यातील कोविड जंबो कोव्हिड सेंटरचा घोटाळा शोधून काढला. जवळपास १०० कोटींच्या कंत्राटाचा घोटाळा असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. तर भावना गवळी प्रकरणातही पैशांचा अपहार झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. ठाण्यातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या बाबतीतला टॉप्स ग्रुप्सच्या संबंधित एमएमआरडीएच्या घोटाळा प्रकरणात प्रताप सरनाईक यांना देण्यात आलेल्या कंत्राटाचा मुद्दा त्यांनी शोधून काढला होता. तर भावना गवळी प्रकरणात बालाजी पार्टिकल्स व्हॅल्युएशन कमी करून हा साखऱ कारखाना स्वतःच्या उपकंपनीने खरेदी केल्याचे आढळले होते. या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करत किरीट सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेतील नेत्यांचे धाबे दणाणून सोडले होते.


 

First Published on: February 14, 2022 3:42 PM
Exit mobile version