धक्कादायक! आईलाच करावी लागली मुलीची प्रसूती

धक्कादायक! आईलाच करावी लागली मुलीची प्रसूती

नाशिक : जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून, अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ 10 ते १५ कुटुंबियांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. यशोदा त्र्यंबक आव्हाटे यांना प्रसूती कळा सुरु झाल्याने रविवारी (दि.५) सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांनी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र, आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी डिलिव्हरी केली. यावेळी गर्भवती महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच परिस्थिती असून, एकही डॉक्टर मुख्यालय राहत नाही. त्यामुळे येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मधे यांनी सांगितले.

First Published on: March 6, 2023 1:49 PM
Exit mobile version