श्रमदानाला आधुनिकतेची जोड !

श्रमदानाला आधुनिकतेची जोड !

बीड जिल्ह्यातील श्रमदान

बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांचा अनोखा प्रयोग
बीड जिल्हा कायम दुष्काळाशी सामना करतो, मात्र पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमुळे जिल्ह्याला दुष्काळाशी लढण्याचे बळ मिळाले आहे. जावईपणाचा आव न बाळगता धारुर तालुक्यातील व्हरकटवाडीतील सासरी गेलेल्या दहा लेकींनी आपल्या पतीला सोबत आणून गावात श्रमदान केले. तसेच श्रमदानाच्या ठिकाणी श्रमकरी गावकèयांना जेवणही दिले. मागील वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या कोळपिंपरी गावात हवेपासून पाणीनिर्मिती करणारे यंत्र बसवण्यात आले. त्याचेही कौतुक होत आहे. अशा प्रकारे दुष्काळाशी दोन हात करताना श्रमदानाला आधुनिकतेची जोड मिळत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
धारूर तालुक्यातील व्हरकटवाडी या ठिकाणी दहा लेकींनी जावईबापूंसह वॉटर कप स्पर्धेकरता श्रमदान केले. नेहमी सासरवाडीवर रुसवे फुगवे काढणाऱ्या जावयांनी चक्क सासरवाडीमध्ये येऊन श्रमदान केल्याने गावासह व्हरकटवाडीच्या पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे. या गावाने गेल्यावर्षी वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी देखील येथील नागरिक तेवढ्याच जोमाने काम करत आहेत.

हवेद्वारे पाण्याची निर्मिती

हवेद्वारे पाण्याची निर्मिती होणार
गेल्या वर्षी धारूर तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कोळपिंपरी गावाने दुष्काळावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मात करण्याचा प्रयत्न केला. या गावात हवेपासून पाणी तयार करणारा देशातील पहिला प्रकल्प बसविण्यात आला. अमेरिकेतील ‘झिरो मास वॉटर सोर्स’ ही संस्था हा प्रकल्प राबवत आहे. या यंत्राची किंमत तब्बल ३० लाख रुपये आहे. त्यामुळे एकेकाळी दुष्काळ ग्रस्त असणाऱ्या कोळपिंपरी गावात चक्क आता हवेपासून पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अशोक हतागळे आणि ग्रामसेवक अमोल राऊत हे तरुण शासकीय अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून गावात ठिय्या मांडून आहेत. त्यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले. महाराष्ट्र शासनाकडून ३५० गावांपैकी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत कोळपिंपरी गावाची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली.

पाणी निर्मिती यंत्र

असे चालणार यंत्र
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावर सौर ऊर्जा आणि हायड्रो पॅनलच्या सहा प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. प्लेट्समध्ये हवेपासून तयार झालेले पाणी साठते. प्रत्येक प्लेट्समध्ये पाच लिटर पाणी जमा होते. हेच शुद्ध पाणी नलिकांद्वारे थेट छोट्या फिल्टरमध्ये जाते. पाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळते. या प्रकल्पाला वीज लागत नाही. हा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. या प्लेट्समध्ये एक चिप बसविण्यात आली. यंत्रात बिघाड किंवा यंत्र चोरीला गेले तर त्यावर थेट अमेरिकेमधून लक्ष ठेवले जाणार आहेत.

First Published on: May 22, 2018 8:23 AM
Exit mobile version