शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा; संजय राऊतांकडून घोषणा

शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा; संजय राऊतांकडून घोषणा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. पाठिंब्यासाठी शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असला तरी, ठाकरे गटाचा शुभांगी पाटील यांना अधिकृत पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. (Shubhangi Patil support from Thackeray group Announcement from mp Sanjay Raut)

सोमवारी संध्याकाळी प्रसारमांध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीचे काय ठरलं हे आता सगळ्यांनाच समजेल. पण या पाच जागांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसेच, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षात उमेदवारीचा घोळ झाला. हा घोळ अजूनही सुरू असून त्यामध्ये आम्हाला पडायचे नाही. काल आमच्याकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे शुभांगी पाटील यांनी या निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला होता. त्यावेळी आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. कारण त्यांची आम्ही तयारी बघितली त्यानुसार त्या या निवडणुकीत लढून पुढे जाऊ शकतात. याबाबत आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना सुचना दिल्या”, असे राऊत म्हणाले.

शुभांगी पाटील या योग्य उमेदवार असून, त्याबाबत आज उद्धव ठाकरेंनी सर्व प्रमुखांना शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत सूचना दिल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

“नागपूर मतदार संघात शिवसेनेचे गंगाधर नाकाडे उमेदवार होते, त्यांची उमेदवारी आम्ही मागे घेण्यास सांगितली. कारण महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा असेल, तर सगळ्यांनी एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे आम्ही ती उमेदवारी मागे घेतली. तसेच, त्या मतदारसंघातील उमेदवार आडबोलो यांना पाठिंबा देण्याचे सांगितले. यासंदर्भात सकाळी नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

याशिवाय, “या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत आणि निर्णयाबाबत विस्कळीत पणा अधिक दिसला. या पुढील निवडणुकीत आपण अधिक काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजेत. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये हा धडा महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाने घेतला पाहिजे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.


हेही वाचा – मला धमकी आली की नाही, हे नॉट रिचेबलवरून कळलं असेल – शुभांगी पाटील

First Published on: January 16, 2023 6:00 PM
Exit mobile version