परमबीर सिंह भ्रष्टाचार प्रकरणी SIT गठीत, ७ सदस्यीय समिती करणार चौकशी

परमबीर सिंह भ्रष्टाचार प्रकरणी SIT गठीत, ७ सदस्यीय समिती करणार चौकशी

अनुप डांगे प्रकरणी परमबीर सिंग यांना एसीबीकडून समन्स; 2 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचना

मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. परमबीर सिंह यांच्या ५ निकटवर्तीय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे परमबीर सिंह आणि ५ पोलीस अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी ७ सदस्यीय एसआयटी स्थापित करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन केल्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात भाईंदरमधील बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. १५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासह अन्य ५ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. तर बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचाही तपास हीच एसआयटी टीम करणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यातही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ सदस्यीय एसआयटीचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरीय अधिकारी असतील.

बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर ठाण्यामध्ये परमबीर सिंह यांच्यासह पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: July 28, 2021 3:25 PM
Exit mobile version