CoronaVirus: धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

CoronaVirus: धक्कादायक! रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून आता कोकणातून यासंबंधी एक धक्कादायक माहिती येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एका सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. रत्नागिरी शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या साखरतर गावात राहणाऱ्या बाळाला त्याच कुटुंबातील महिलेपासून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. ती महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. सध्या या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तबलीग जमातशी संबंधीत काहीजण गावात आले होते, त्यातून बाळाला संसर्ग झाला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Coronavirus Lockdown: ‘लोकांना मदत देतानाचे फोटो-व्हिडिओ काढून त्यांना लाजवू नका’

काय आहे प्रकरण

रत्नागिरी येथील काही अंतरावर असलेल्या साखरतर या गावात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे ८ एप्रिल रोजी उघडकीस आले होते. त्यामुळे प्रशासनाने हे गाव सील करून व्यापक स्वरूपात तपासणी मोहीम सुरू केली. त्यामध्ये चार दिवसांनी तिच्या कुटुंबातील आणखी एका महिला नातेवाईकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यातील सहा महिन्यांच्या बाळाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, बाळाची प्रकृती काळजी करण्यासारखी नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी तबलीग जमातशी संबंधीत काहीजण या गावात आल्याचे बोलले जात आहे. त्यातून हा संसर्ग लोकांना झाला असावा, अशा संशय व्यक्त होत आहे. सध्या रत्नागिरी शहरात राजिवडा आणि साखरतर या दोनच ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. दरम्यान, रत्नागिरीतील ४ कोरोनाबाधितांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून राजिवडा येथील रूग्णही तबलीग जमातशी संबंधीत आहे.

First Published on: April 14, 2020 1:56 PM
Exit mobile version