सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही तर आसाममध्ये; आसाम सरकारचा अजब दावा

सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाही तर आसाममध्ये; आसाम सरकारचा अजब दावा

देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग हे आसाम राज्यात असल्याचा दावा आसाममध्ये असलेल्या भाजप सरकारकडून करण्यात आला आहे. यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग ही महाराष्ट्रामध्ये आहेत. यातील पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे देशभरातील अनेक भाविक हे दर्शनासाठी येत असतात. पण आता ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळविणायचे काम सुरु आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पाठविण्याचे काम सुरु आहे, असा आरोप आसाम सरकारवर करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे खरे नसल्याचा दावा सुद्धा आसाम सरकारकडून करण्यात आला आहे.

आसाममध्ये असलेले भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा सरमा यांनी एका जाहिरातीमध्ये आसाममध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पण या जाहिरातीमध्ये त्यांनी आसाम राज्यात असलेल्या डाकिनी टेकडीच्या कुशीत वसलेल्या पमोही गुवाहाटी येथील शिवलिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा यांनी केलेल्या या अजब दाव्यामुळे महाराष्ट्रातील नेते मंडळींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आसाम मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या दाव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत, खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केला आहे. याबाबत सचिन सावंत आणि सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.

“भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!,” असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. तर महाराष्ट्रातील भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा पुरावा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील भाजपवार या मुद्द्यावरून आगपाखड केली आहे. सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.”

First Published on: February 15, 2023 10:10 AM
Exit mobile version