पाणी म्हणून डिझेल प्यायल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

पाणी म्हणून डिझेल प्यायल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

वेदांत गौतम गायकवाड या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पाणी म्हणून डिझेल प्यायल्याने एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. वेदांत गौतम गायकवाड असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने रात्री उशिरा त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, देहूगाव परिसरातील विठ्ठलवाडी येथे मयत दीड वर्षीय वेदांतचे आई-बाबा आणि मोठी बहीण राहतात. घरात गरिबी असल्याने गॅस नाही. बुधवारी आईने स्टो पेटवण्यासाठी डिझेलचा वापर केला होता. ती बॉटल आहे तशी जमिनीवर पडून राहिली. वेदांत खेळता खेळता गेला आणि त्याने पाणी म्हणून डिझेल प्यायला. दरम्यान, हे सर्व वेदांतच्या आईच्या लक्ष्यात आले. वेदांत उलटी करू लागला, डोळे पांढरे पडत होते, त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. तर एकीकडे त्याच्या आईला काय करावं सुचत नव्हतं. अखेर वेदांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याच्यावर उपचार सुरू झाले.

परंतु, रात्री उशिरा त्याची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याचे आई वडील दोघेही मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. मयत दीड वर्षीय वेदांत पेक्षा लहान काही महिन्यांची एक मुलगी आहे. गायकवाड कुटुंबीयांचा सुखी संसार सुरू होता. मात्र या घटनेमुळे सर्वच बदलून गेले आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

First Published on: May 24, 2019 10:03 PM
Exit mobile version