रेशनिंगच्या तांदळाची आफ्रिकेत तस्करी

रेशनिंगच्या तांदळाची आफ्रिकेत तस्करी

लॉकडाऊनच्या कालावधीत गरिबांना मोफत पुरवण्यासाठी असलेल्या शासकीय तांदळाचा 380 मेट्रिक टन अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. राज्याच्या विविध ठिकाणासह कर्नाटकमधून चोरलेल्या या तांदळाचा ठिकठिकाणी साठा करण्यात आला होता. या टोळीने निर्यातबंदी असतानाही अवैधरित्या शासकीय तांदळाचा साठा करून आफ्रिकेला विकल्याचेही तपासात समोर आले आहे.

पळस्पे येथे शासकीय वापराच्या धान्याचा अवैध साठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या पथकाने टेक केअर लॉजिस्टिक गोडाऊनवर छापा टाकला होता. त्याठिकाणी 110 मेट्रिक टन तांदूळ जप्त करण्यात आले होते. हे तांदूळ महाराष्ट्रासह कर्नाटकमधील शिधावाटप दुकानातला होता. लॉकडाऊन काळात गरजूंना मोफत पुरवठा करण्यासाठी शासनाकडून हे धान्य पुरवण्यात आले होते. मात्र, या टोळीने सदर धान्याचा अपहार करून ते त्याठिकाणी साठवले होते.

नवी मुंबईच्या पोलीस पथकाने भिवंडी व खालापूर येथे छापे टाकून अधिक 270 मेट्रिक टन धान्य जप्त केले. भिवंडी येथील भादाणे गावातील जय आनंद फूड कंपनी, खालापूरमधील झेनिथ इम्पॅक्ट कंपनी व जय फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी हा अवैध धान्यसाठा करण्यात आला होता. त्या ठिकाणावरून जप्त केलेल्या एकूण शासकीय धान्याची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे. या गुन्ह्यात 18 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी तिघांना बुधवारी अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नवनाथ राठोड (25), सत्तार सय्यद (25) व कृष्णा पवार (45) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नवनाथ व सत्तार हे कर्नाटकचे राहणारे असून कृष्णा हा विजापूरचा आहे.

कर्नाटक व महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून अपहार करून साठवलेला हा शासकीय तांदूळ आफ्रिकेला पाठवला जात होता. विशेष म्हणजे निर्यात बंदी असतानाही त्यांनी आजवर माल पाठवला कसा असाही प्रश्न उद्भवत आहे. या टोळीने जानेवारी ते अद्यापपर्यंत 32 हजार 827 मेट्रिक टन तांदूळ आफ्रिकेला निर्यात केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याकरिता वेगवेगळ्या राज्याचे शासकीय शिक्के वापरण्यात आले आहेत. यानुसार सदर टोळीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या टोळीच्या मुळाशी पोचण्यासाठी परिमंडळ दोन व गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे.

First Published on: September 3, 2020 6:49 AM
Exit mobile version