सोलापूर बाजार समितीची १ जुलैला निवडणूक

सोलापूर बाजार समितीची १ जुलैला निवडणूक

निवडणूक (फोटो सौजन्य - अमर उजाला)

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. १ जुलै रोजी मतदान आणि ३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. २९ मे ते २ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. ४ जून रोजी छाननी असून १९ जून ही अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २० जूनला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत या बाजार समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. माजी आमदार दिलीप माने यांनी मागील पाच वर्षे बाजार समितीचा कारभार पाहिला. परंतु, सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार व पणन मंत्रिपद आल्यानंतर मात्र देशमुखांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदान संघात २०१४ साली त्यांना टक्कर दिलेले व बाजार समितीचे सभापतीपद भूषविलेले दिलीप माने यांचा मात्र देशमुखांनी काटा काढला. पाच वर्षांतील बाजार समितीच्या घोटाळ्यांची मालिका बाहेर काढून देशमुखांनी बाजार समितीवर दीड वर्षांपूर्वी प्रशासक नेमला. तेव्हापासूनच बाजार समितीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशा राजकारणाला सुरुवात झाली.

First Published on: May 29, 2018 11:49 AM
Exit mobile version