आज कंकणाकृती सूर्यग्रहण

आज कंकणाकृती सूर्यग्रहण

सूर्यासमोर चंद्र येत असल्याने गुरुवारी 26 डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून, ते दक्षिण भारतातून दिसणार आहे. मुंबईप्रमाणे माथेरानमध्येही खंडग्रास स्थितीतील ग्रहण दिसणार असून, साधारण 85 टक्के सूर्य झाकोळला गेलेला पहायला मिळेल. हे विलोभनीय दृश्य पहाण्यासाठी आतुरलेल्या खगोलप्रेमींनी येथे मोठी गर्दी केली आहे. येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे दृश्य पाहता येणार आहे. शाळेचे संचालक आणि खगोल अभ्यासक शशीभूषण गव्हाणकर पूर्वेकडील पॉइंटवरून या सूर्यग्रहणाची माहिती देणार आहेत.

एका वर्षात जगभरात साधारणपणे 2 ते जास्तीत जास्त 5 ग्रहणे होतात. मात्र ती पहावयास मिळण्याच्या जागा भिन्न असतात. यातील खग्रास सूर्यग्रहण हा अत्यंत दुर्मिळ योग असतो. दीड वर्षांत फक्त एकदा खग्रास सूर्यग्रहण संपूर्ण पृथ्वीवरून दिसू शकते. यावेळी सकाळी 8 च्या सुमारास ग्रहण सुरू होणार असल्याने, तसेच डिसेंबर महिन्यामुळे अनेकजण याचा आनंद घेऊ शकतील. हे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार असल्याने ती पर्वणी ठरणार आहे. भारतातून कंकणाकृती स्थिती साधारण सव्वातीन मिनिटे दिसेल. आखातापासून भारतापर्यंतच्या पट्ट्यात अनेक अभयारण्ये आणि प्रेक्षणीय स्थळे असल्याने ग्रहणासोबत पर्यटनाचासुद्धा आनंद घेता येणार आहे.

ग्रहणाचे प्रकार..
1) खग्रास.. सूर्य संपूर्ण झाकोळला जातो
2) खंडग्रास.. सूर्याचा काही भाग झाकोळला जातो
3) कंकणाकृती.. सूर्याची कडा झाकोळली जात नसल्यामुळे एक तेजस्वी कंकण दिसते

ग्रहण पहाण्याच्या पद्धती..
साध्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहिल्यास तात्काळ अंधत्व किंवा डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी पुढील पर्याय निवडावेः-
1) मायलर फिल्मपासून बनविलेला चष्मा
2) वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी काच
3) पिन होल कॅमेरा

मुंबईहून दिसणार्‍या ग्रहणाच्या वेळा..
ग्रहण सुरुवात: सकाळी 8.04
ग्रहण मध्य: सकाळी 9.21 (खंडग्रास स्थिती : 85 टक्के सूर्य झाकोळला जाईल)
ग्रहण समाप्ती : सकाळी 10.55

इतर दक्षिणेकडील ठिकाणांच्या वेळा साधारण सारख्याच असल्या तरी कंकणाकृती स्थितीचा काळ भिन्न असेल.
ग्रहणाविषयीच्या अंधश्रद्धा डोक्यातून काढून अगदी निर्धास्तपणे, पण डोळ्यांची योग्य खबरदारी घेऊन या विलोभनीय खगोलीय खेळाचा आनंद लुटला पाहिजे.
-आदित्य देसाई, खगोल अभ्यासक

First Published on: December 26, 2019 3:35 AM
Exit mobile version