दीड हजारांसाठी पोटच्या मुलाला विकले

दीड हजारांसाठी पोटच्या मुलाला विकले

जळगाव : आठ मुले, आजन्म गरिबी, त्यात कोरोनामध्ये पतीचा मृत्यू… अशा एक ना अनेक संकटांशी झुंजणार्‍या महिलेने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या लेकराला सूरतमधील एका महिलेला अवघ्या दीड हजार रुपयांसाठी विकण्याचा सौदा केल्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेळीच तपासचक्र फिरवत मुलांसह या महिलेला ताब्यात घेऊन महिला व बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात ४० वर्षीय महिला आपल्या पतीसह मोलमजुरी करुन आठ मुलांचा सांभाळ करत होती. मात्र, कोरोनाच्या काळात या महिलेच्या पतीचे आजाराने निधन झाले. या दाम्पत्याला चार मुले आणि चार मुली असे एकूण आठ मुलं आहेत. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले. मात्र पतीच्या अचानक निधनाने या महिलेवर अन्य सात मुलांची जबाबदारी आली. चार मुले ही सहा वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. तर, तीन मुली या ६ ते १२ वयोगटातील आहेत. त्यात पती नसल्याने मिळेल ती मजुरीची कामे करुन महिला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उदरनिर्वाह करत होती. फुटपाथवरच ती आपला संसार चालवत होती. मात्र, हे सर्व तिला अतिशय अशक्यप्राय झालं होतं. अखेर मुलांवर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने तिने निराश होऊन आपल्या एका मुलाला अन्य एका नागरिकाच्या सांगण्यावरून विकण्याचा निर्णय घेतला. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेने हा सर्व प्लॅन फसला आणि या महिलेसह मुलांना महिला बाल कल्याणकडे सुपूर्द करण्यात आले.

सूरतला केला होता व्यवहार

हतबल झालेल्या या महिलेस तेथीलच एका व्यक्तीने मुलाची विक्री करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा गुजरात राज्यातील सूरतच्या एका महिलेला दोन वर्षाचा मुलगा अवघ्या दीड हजार रुपयांमध्ये विकण्याचे ठरवले गेले. एवढेच नव्हे तर संबंधित महिलेने इतर मुलांचाही काही हजार रुपयांमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहितीही पोलीस तपासात पुढे येत आहे.

First Published on: July 30, 2022 1:06 PM
Exit mobile version