कोकणी चाकरमान्यांका सोनू सूद पावलो

कोकणी चाकरमान्यांका सोनू सूद पावलो

सोनू सूद

दर वर्षी मुंबई आणि उपनगरातील हजारो चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणात जात असतात. महिना-दोन महिने आधीच रेल्वे आणि एसटीचे तिकीट आरक्षित करून ठेवतात. मात्र यंदा कोरोनामुळे आंतर जिल्हा प्रवासाला बंदी आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे चाकरमान्यांच्या हाताला काम नाही, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने कसलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे चाकरमान्यांच्या एका मंडळाने गावाला जाण्यासाठी अभिनेता सोनू सूद यांच्याकडे धाव घेतली. सोनू सूद यांनी त्यांना मदत करण्याचे मान्य केले आहे. राज्य सरकारची उदासीनता पाहता मुंबईतील या एका कोकणी मंडळाप्रमाणे अन्य मंडळे आणि चाकरमानी सोनू सूद यांची मदत घेतील, असे दिसते.

कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील रेल्वे आणि एसटीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या कोकणी नागरिकांसाठी नियमानुसार ई-पास काढून खासगी बसने प्रवास करणे हाच एक पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन खासगी वाहतूकदारांनी कोकणात जाण्यासाठी तिप्पट भाडे आकारायला सुरुवात केली आहे. आधीच कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडलेले असताना, केवळ प्रवासासाठी एका प्रवाशाला दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. तसेच ई-पाससुद्धा रद्द होत असल्याने गणेश भक्तांनी एसटी बसेस सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती.

मात्र आतापर्यंत राज्य सरकारने कसलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे गणपतीला गावाला जायचे कसे, असा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे. अशा वेळी युपी बिहारमधील लोकांना लॉकडाऊनमध्ये आपापल्या गावी सोडण्यासाठी गाड्यांची सोय करणार्‍या सोनू सूदची चाकरमान्यांना आठवण झाली. मुंबईतील करी रोड खापरादेव मंडळाने मदतीसाठी अभिनेता सोनू सूद यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी मदत करण्याचे मान्य केले. यासंबंधी दैनिक ‘आपलं महानगर’ने अभिनेता सोनू सूद यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

नोकर्‍या गेल्यामुळे मागितली मदत
लॉकडाऊनमुळे मुंबईतील कोकणी चाकरमान्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. मात्र कोकणात जाणार्‍यांसाठी सरकारने आतापर्यंत कुठलीही सोय केलेली नाही. त्यामुळे मानाचा गणपती बसवण्यासाठी कोकणात जायचे कसे हा मोठा प्रश्न खापरादेव मंडळासमोर उभा राहिला होता. त्यामुळे त्यांनी सोनू सूदकडे मदत मागितली. त्यांनी आम्हाला कोकणात जाण्यासाठी नि:शुल्क बसगाड्या उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती खापरादेव मंडळाने दिली आहे.

१५० चाकरमान्यांचे बुकिंग
खापरादेव मंडळाकडून कोकणात जाणार्‍या 150 चाकरमान्यांची सर्व माहिती गोळा केली आहे. त्यानुसार आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्रसुध्दा गोळा केली आहेत. कारण आम्ही फक्त 150 चाकरमान्यांची सोय करण्याची मागणी सोनू सूद यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी आमची मागणी मान्य केली आहे. करी रोड ते कणकवलीपर्यंत ही बस धावणार आहे. ४ ते ६ ऑगस्ट या काळात या प्रवाशांना मोफत गावी पोहोचविले जाणार आहे, याबद्दल मी सोनू सूद यांचा आभारी आहे, अशी माहिती करीरोड येथील खापरादेव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र तावडे यांनी दिली आहे.

First Published on: August 1, 2020 6:51 AM
Exit mobile version