विशेष : प्रेमविवाहानंतर ड्रग्सची सक्ती, लैंगिक अत्याचार; तरुणी आता मनोरुग्ण

विशेष : प्रेमविवाहानंतर ड्रग्सची सक्ती, लैंगिक अत्याचार; तरुणी आता मनोरुग्ण

नाशिक : आपल्या विवाहाला कुुटुंबियांकडून विरोधच होणार असल्याचा समज करुन घेत प्रियकरासोबत नाशिकहून पुण्यामध्ये प्रेमविवाह केलेल्या तरुणीवर प्रियकर व त्याच्या मित्रांनी ड्रग्जची सक्ती करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारणात प्रियकराने धोका दिल्याने पीडित तरुणीला कमालीचा मानसिक धक्का बसला असून, ती मनोरुग्ण झाली आहे. आता तिच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत.

घटस्फोटांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करीत घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आपलं महानगर’ने ‘तुझं माझं जमेना!’ ही वृत्त मालिका काही दिवसांपासून सुरु केली आहे. या मालिकेला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेकांनी ‘आपलं महानगर’कडे आपले अनुभव कथन केले आहेत. घटस्फोटाशीच संबंधीत नाशिक कौटुंबिक न्यायालयात दाखल एका प्रकरणासंदर्भातील माहिती एका जागृत वाचकाने ‘आपलं महानगर’ला दिली. त्याची शहानिशा केली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्यानुसार, शहरातील एक अल्पवयीन मुलगी चार वर्षांपूर्वी आजी व आजोबांसोबत राहत होती. तिची परिसरातील एका मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. नंतर सूत जुळले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. किशोरवयीन असल्याने दोघांमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण झाले. प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर मुलीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला.

कौटुंबियांचा लग्नास विरोध होईल, असा समज करुन घेत दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोघांनी संगनमताने पुण्यात लग्न करण्याचे आणि एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्याचे ठरविले. त्यानुसार, दोघेही नाशिकहून एका खासगी वाहनाने पुण्याला गेले. दुसर्‍या दिवशी मित्रांच्या उपस्थितीत धार्मिकस्थळी दोघांनी लग्न केले. त्यानंतर दोघेही एका फ्लॅटवर आले. मात्र इकडे आजी व आजोबांना सोडूून आल्याने मुलगी कमालीची नाराज होती; पण लग्न झाल्याने आणि प्रियकर सोबत असल्याने तिने आपली नाराजी लपवली. प्रियकर विश्वासघात करेल, अशी पुसटशी कल्पनाच तिला नव्हती. मात्र, प्रियकराने तिचा विश्वासघात केला.लग्नानंतर पहिल्याच रात्री प्रियकराने तिला झोपेत इंजेक्शनमधून ड्रग्ज दिले. त्यातून तिला नशा आली. पहिल्या रात्री प्रियकराने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी मुलची प्रकृती बरी करण्याच्या बहाण्याने त्याने गोळ्या आणि इंजेक्शनमधून ड्ग्ज दिले. त्यानंतर ती ड्रग्जच्या नशेत राहू लागली. ती नशेत असताना प्रियकर मित्रांना फ्लॅटवर बोलवून घ्यायचा. त्यावेळी त्याचे मित्र तिच्यावर अत्याचार करायचे. तीन आठवड्यानंतर शुद्धीवर असताना तिला प्रियकराने फसवणूक केल्याचे लक्षात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. ज्याच्यासाठी घरदार सोडून आले, त्यानेच धोका दिल्याचे जाणीव होताच तिला मानसिक आघात झाला.

प्रियकर वारंवार तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करायचा. तिने नकार दिला की तो तिला बळजबरीने इंजेक्शनमधून ड्रग्ज द्यायचा. त्यानंतर तो पुन्हा तिच्यावर अत्याचार करायाच. काही दिवसांनी प्रियकर अचानक तिला सोडून गेला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी भावनिक आधार देत तिला त्यांच्या फ्लॅटवर आणले. मात्र, त्याच्या मित्रांनीदेखील ड्रग्ज देत तिच्यावर अत्याचार केले. त्यातून तिचे आणखी मानसिक संतुलन बिघडले. काही दिवसांनी त्याच्या मित्रांनी तिला नाशिकला आणून सोडले. तिचे वडील वेगळे राहत असल्याने ती आजी-आजोबांकडे राहू लागली. तिची परिस्थिती बघून आजी-आजोबांनी मानसिक उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असून, फसव्या प्रियकराविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. आता पीडित तरुणी २७ वर्षांची आहे. तिचे वडील विभक्त राहत असल्याने तिचे पालनपोषण करण्यास नकार दिला आहे.

 

(आपल्या प्रतिक्रिया, अनुभव 9022557326 या क्रमांकावर व्हाट्स द्वारे कळवू शकता)

First Published on: November 16, 2022 12:55 PM
Exit mobile version