विशेष भाग ५ : विवाहबाह्य संबंधांमुळे नात्याला तडा, संसारांची होते मोडतोड

विशेष भाग ५ : विवाहबाह्य संबंधांमुळे नात्याला तडा, संसारांची होते मोडतोड

नाशिक : घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यास विवाह बाह्य संबंध हे एक मोठे कारण असल्याची बाब नाशिकमधील वकील, समुपदेशक, मानोसोपचार तज्ज्ञ आणि डिटेक्टीव्ह एजन्सीजच्या संचालकांशी चर्चा केली असता पुढे आली आहे. एकूण घटस्फोटांमध्ये सुमारे ४० टक्के घटस्फोट हे विवाह बाह्य संबंधांमुळे होतात, असेही संबंधितांनी ‘आपलं महानगर’शी बोलतांना सांगितले.

जागतिकीकरण, बदलते स्पर्धात्मक चित्र, सेवा क्षेत्रात होत असलेला उदय आणि आधुनिक ज्ञानाचा विस्फोट आदींमुळे मल्टिनॅशनल कंपन्या, आयटी क्षेत्र, बँका यांमध्ये १५ ते १६ तास काम करावे लागते. टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान असते. स्पर्धा मोठी असते. १५-१६ तास स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात. विचारांची देवाणघेवाण होत असते, कामामध्ये एकमेकांना सहकार्य होत असते. अशावेळी भावनिक गुंतवणूक होऊन काही पुरुष आणि स्त्रियांचे विवाहबाह्यसंबंध प्रस्थापित होतात. विवाहित स्त्री-पुरुषांमध्ये चांगले नाते असू शकत नाही का, असाही प्रश्न नेहमी विचारला जातो. अलीकडच्या काळात विवाहित स्त्री-पुरुषांमध्ये सुद्धा चांगल्या मैत्रीचे नाते असते, त्याला विवाहबाह्यसंबंध म्हणता येणार नाही; परंतु यातून जोडीदारापैकी कोणाच्या मनात संशयाचे भूत निर्माण होते आणि मग पुढचे चित्र वेगळे दिसते. कधीकधी विवाहापूर्वी मित्र- मैत्रिणीशी असलेल्या घट्ट मैत्रीतून भावनिक गुंतवणूक होते, परंतु पालकांच्या दबावामुळे दुसर्‍याच व्यक्तीशी विवाह करावा लागतो आणि मग अशा परिस्थितीत स्वभाव जुळत नाही किंवा अन्य कारणास्तव दोन्ही संमतीनुसार घटस्फोट घेतला जातो.

नोकरीमुळे एकमेकांना वेळ देणे कमी झाल्यामुळे भावनिक गोष्टींमध्ये भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात. जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये बदलताना दिसतो. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही, समाधान, आनंद देणारे दुसरे कोणीतरी आहे, हा आता तरुणांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. लग्न झाल्यानंतरच दुसर्‍या स्त्रीशी किंवा पुरुषाशी संबंध असतात असं नाही. तर काहीवेळा लग्नआधीपासून असे संबंध असतात. लग्नानंतर ते सुरुच राहतात. हे लक्षात आल्यानंतर जोडीदार घटस्फोटासाठी अर्ज करतो. काहीवेळा नवरा-बायको दोघांचेही विवाहबाह्य संबंध असतात. अनेकदा एकमेकांना याबाबत माहीतही असते. पण, ते फक्त एकमेकांवर आरोप करत राहतात. गोष्टी टोकाला गेल्या की मग घटस्फोटाचा निर्णय घेतात. लग्नाआधीचे संबंध लग्नानंतर सुरु राहणे, लग्नानंतर जोडीदाराकडून प्रेम, वेळ मिळाला नाही की दुसरे कोणीतरी शोधणे आणि दोघांचेही जोडीदाराव्यतिरिक्त संबंध असणे असे विविध प्रकार विवाहबाह्य संबंधामध्ये आढळून येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यात विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत पोहचणार्‍यांचे प्रमाण साधारणत: ४० टक्क्यांपर्यंत आहे. लग्न झाल्यावर अवघ्या एक ते दोन महिन्यांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे प्रकरणेही आमच्याकडे आली आहेत. केसेसचे जर अवलोकन केले तर लग्नापूर्वी असलेले प्रेमसंबंध लग्नानंतरही पुढे चालू राहण्याचे प्रकार सध्या वाढलेले आहेत. तसेच इच्छेविरुद्ध लग्न झाले तर संबंधित पुरुष किंवा स्त्री अन्य व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित करतांना दिसतात. यात सर्वच विवाहबाह्य संबंध हे लैगिंक गरजांच्या पूर्ततेसाठी असतात असे नाही. तर त्याला आर्थिक आणि मानसिक कारणांचीही त्याला जोड असते. : देवेंद्र पवार, संचालक, शेरलॉक्स डिटेक्टिव्ह एजन्सी

विवाह म्हणजे दोन मनांचे अतुट बंधन. एकमेकावरील विश्वास हा त्या नात्यांचा पाया. विश्वास या शब्दात वीष आणि श्वास हे दोन्ही शब्द आहे. त्यातील कोणत्या शब्दांला आपण स्वीकारावे हे ठरवायला हवे. विवाहबाह्य अनैतिक संबंध म्हणजे आपणच आपल्या हाताने आपले घर उध्वस्त करणे. केवळ जोडीदाराचेच नव्हे तर आपल्या मुलांचेही भावविश्व आपण उध्वस्त करतो. विवाहबाह्य संबंध हे विवाहसंस्था संपवत चाललेली किड आहे. आजकाल विवाह बाह्य संबंधांचा इतका सुळसुळाट झाला आहे की ज्या स्त्री पुरुषांमध्ये प्रांजळ मैत्री असते त्यांच्या कडे सुध्दा संशयाने बघितले जाते आणि हे सुध्दा एक घरगुती कलाहाचे कारण पुढे येताना दिसते. : अ‍ॅड. कविता देशमुख, वकील, जिल्हा सत्र न्यायालय

विवाहबाह्य संबंधांची प्रमुख कारणे

First Published on: November 16, 2022 1:02 PM
Exit mobile version