Special Report : गुन्हेगारीसाठी वाढला बालकांचा वापर

Special Report : गुन्हेगारीसाठी वाढला बालकांचा वापर

सुशांत किर्वे । नाशिक

पंचवटीत २० जानेवारी २०२३ रोजी रात्री १२.३० वाजता दोन बालगुन्हेगार (विधीसंघर्षित बालक) यांनी दारूसाठी पैसे मागणार्‍या १९ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. एनसीआरबीच्या २०२१ च्या अहवालातील आकडेवारी पाहता देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे.हालाखीची कौटुंबिक स्थिती, पालकांचे दुर्लक्ष, वाईट संगत आणि व्यसने, त्यात सोशल मीडियाचा अतिवापरासह पॉर्नचे वाढते जाळे यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, सराईत गुन्हेगार बालकांचा गुन्हेगारीसाठी उपयोग करुन कायदाचा दूरउपयोग करत असल्याचीही धक्कादायक बाब यानिमित्ताने समोर आली आहे.

नाशिक शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत तब्बल ४ हजार ४५५ गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील चोरी, मारहाण, मोबाईल हिसकावणे, दुखापती करणे यासह विविध गुन्ह्यांमध्ये विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांकडून चोरी, पाकीटमारी, मारामारीसारखे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही. मात्र, नाशिक शहरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही मुलांचा समावेश वाढला आहे. खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न आदी दखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अल्पवयीन मुलांना गुन्हेगार म्हणून ताब्यात घेतले आहे. अनेक बालके मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. तर काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यामध्ये वापर करून घेतात. मित्रांची साथसंगतगुन्हेगारीकडे प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर, आक्षेपार्ह रिल्स तयार करणे, गुंडांना फॉलो करण्याचे प्रमाण वाढत असून, यातून गुन्हेगारीला पोषक वातावरण तयार होत आहे.

बालगुन्हेगारी वाढण्याची कारणे
विधीसंघर्षग्रस्त बालकांवर अशी होते कारवाई
असे आहेत बालगुन्हेगारी रोखण्याचे उपाय
राज्यातील बालगुन्हेगारी आकडेवारी

विधीसंघर्ष ग्रस्तबालकांकडे समाजाने ते या समाजाचा भाग आहेत म्हणून त्यांना सामावून घेण्याची गरज आहे. त्यासाठी सामाजिक दृष्टिकोनात बदलाची आवश्यकता आहे. समाजामध्ये बालके जेव्हा अशा प्रकारे कायद्याचे विरोधी वर्तन करतात, त्यावेळेस केवळ पालकांनीच नाही तर समाजानेदेखील अंतर्मुख होण्याची गरज आहे. बालकांसाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.वंचित व दुर्लक्षित घटक असणार्‍या बालकांना विशेष सहाय्याची गरज असते. विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी आपल्या सर्वांच्या सकारात्मक पाठिंब्याची गरज आहे. परिणामी, बालकांमध्ये नक्कीच बदल होऊन ते समाजाचे प्रवाहात येतील. हा आशावाद आपण सर्वांनी बाळगायला हवा. : शोभा पवार, सदस्य, बाल न्याय मंडळ, नाशिक

नाशिक शहरात बालगुन्हेगारीत वाढ होते आहे, हे खरे आहे. कायद्याचा गैर वापर करत अनेकजण अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करत आहेत. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. मुलेमुली मोबाईलवर काय करतात, त्यांची संगत कोणत्या मुलामुलींसोबत आहे, याची माहिती ठेवावी. शिवाय, शाळा, महाविद्यालयांमध्ये बालगुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम झाले पाहिजेत. : प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक

First Published on: February 15, 2023 12:41 PM
Exit mobile version