ठाण्यात यूपीएससी पूर्व परीक्षेच्या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाण्यात यूपीएससी पूर्व परीक्षेच्या सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकसेवा आयोग

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग  (UPSC) पूर्वपरीक्षा 28 मे 2023 रोजी होणार असून या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत 3 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या सराव परीक्षा सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेमार्फत एकूण 36 सराव परीक्षा सत्र आयोजित केली असून सदर सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे  तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन केले जाणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 28 मे 2023 रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन,महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढविणेकरीता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत संस्थेतील 2022-23 या प्रवेश वर्गातील विद्यार्थी व ठाणे शहरातील इच्छूक विद्यार्थी यांचेकरीता 03 जानेवारी ते 25 मे 2023पर्यंत एकूण 36 सराव परीक्षा सत्राचे व सदर सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे  तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन करणेबाबतचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, उपआयुक्त अनघा कदम व संचालक  महादेव जगताप यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदरची विशेष सराव परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडणेकरीता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. तसेच, ठाणे शहर व लगतच्या परीसरातील विद्यार्थ्यांना सदरची विशेष सराव परीक्षा देण्याची इच्छा असल्यास, अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

First Published on: January 6, 2023 10:05 PM
Exit mobile version