CoronaEffect : १०वीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द, ९वी-११वीचीही परीक्षा रद्द!

CoronaEffect : १०वीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द, ९वी-११वीचीही परीक्षा रद्द!

लॉकडाऊनमुळे १०वीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर पडला होता. त्यासोबतच ९वी आणि ११वीच्या परीक्षा देखील अडकल्या होत्या. मात्र, आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय, १०वीचा राहिलेला भूगोलाचा पेपर देखील रद्द करण्यात आला आहे. या पेपरचे गुण मूल्यांकनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नववी आणि अकरावीची परीक्षा न घेता वर्षभरातील प्रगती आणि मूल्यमापन करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारला दिला होता. त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा १४ एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून त्यांची वर्षभरातील प्रगती आणि मुल्यांकन करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारला सादर केला होता. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या परीक्षा आता रद्दच करण्यात आल्या आहेत.

९वी आणि ११ वीच्या दुसऱ्या सत्रातली परीक्षा न घेता पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या, प्रात्याक्षिके आणि अंतर्गत मूल्यमापन करून त्यानुसार त्यांना पुढच्या वर्षात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाच्या नियमांनुसार १०वीचा भूगोलाचा पेपर रद्द करून त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

वर्षा गायकवाड, शिक्षण मंत्री

First Published on: April 12, 2020 6:25 PM
Exit mobile version