दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये

दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या. बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर, दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बारावीचा निकाल जुलै तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 9 मे 2021 दरम्यान घेण्यात येणार आहे. बारावी परीक्षेचा निकाल अंदाजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शालांत परीक्षा म्हणजे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान होणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोविड 19 संदर्भात केंद्र व राज्य सरकारने तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या तारखांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानिक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकार परिषदेस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, सहाय्यक संचालक दिनकर टेमकर उपस्थित होते.

First Published on: January 22, 2021 6:58 AM
Exit mobile version