माळशिरसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

माळशिरसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सवतगव्हाण तालुका माळशिरस येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने हातावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेळीच मित्राने प्रसंगावधान दाखवल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न फसला असून विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे. सागर भारत काळे असे त्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. शनिवार, ९ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेची पोलिसात नोंद झालेली नाही. सवतगव्हाण येथे निवासी शासकीय आश्रमशाळा आहे.

मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला जीव 

दरम्यान, आश्रमशाळेतील सागर काळे या विद्यार्थ्याने जो आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्या बाबतीत घडलेल्या प्रकारची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार साळवे यांनी दिली. सागर काळे हा इयत्ता तिसरीपासून शिकत असून सध्या तो दहावीची बोर्डाची परीक्षा देत आहे. शनिवारी रात्री सात साडे सातच्या सुमारास शाळेच्या किचनमध्ये तो जेवण्याकरता गेला असता तेथील कर्मचाऱ्याने भात संपला असे सांगितले. त्याला भूक लागल्याने त्यावर तो ‘मामा, तुम्हाला भात करावा लागेल’, असे या विद्यार्थ्याने म्हटल्यावर शाळेचे अधीक्षक त्याला रागावले. त्यावेळी अधिक्षिकादेखील त्याला रागावल्या असल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले. या दोघांमुळे चिडून खोलीत झोपायला गेल्यावर ब्लेडने हातावर वार केले, असे तो म्हणाला. त्याच्या मित्राने हा प्रकार पाहिल्यावर एका शिक्षिकेला सांगितले. नंतर त्या विद्यार्थ्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेल्या.

First Published on: March 12, 2019 10:02 AM
Exit mobile version