एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा!

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा!

एस.टी महामंडळाची 'मेगा भरती' - परिवहन मंत्री दिवाकर रावते

दिवाळीसाठी जादा एसटी बसेस सोडताना एसटी कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा भार टाकतानाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील जाहीर केली आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना १२वीनंतर उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. एसटी महामंडळाकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तसे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहे. यासंदर्भातले परिपत्रक नुकतेच महामंडळाच्या कर्मचारी विभागाकडून जारी करण्यात आले आहे. राज्यभरातल्या महामंडळाच्या सुमारे १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

नुकतीच परिवहन विभागाकडून दिवाळीच्या दरम्यान जादा बसेस सोडण्याची घोषणा करण्यात आली होती. एकीकडे इतर सामान्य नागरिक दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आनंद साजरा करत असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांना मात्र अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागणार होता. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने शिष्यवृत्तीसंदर्भात केलेली ही घोषणा एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याच्या २ पाल्यांना लाभ!

अनेकदा १२वीनंतर केवळ पैशांअभावी अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडून कामधंदा करावा लागतो. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण अपुरं राहातं. त्यांच्या करिअरला ब्रेक लागतो. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महामंडळाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर दरमहा ७५० रुपये इतकी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावर महामंडळातर्फे थेट जमा करण्यात येईल. दरवर्षी कामगार अधिकारी शिष्यवृत्ती पात्र पाल्यांची नावे मागवतील. त्यांची छाननी करून लाभार्थी पाल्यांच्या बँक खात्यावर दरमहा सदर रक्कम जमा करण्यात येईल. प्रत्येक एस.टी. कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

First Published on: October 6, 2018 7:39 PM
Exit mobile version