उद्यापासून एसटीची मालवाहतूक महाग होणार

उद्यापासून एसटीची मालवाहतूक महाग होणार

एसटी मालवाहतूक सेवा

कोरोना काळात आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचा महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने माल वाहतूक क्षेत्रात उडी घेतली आहे. राज्यभरात एसटीची मालवाहतूक धड्याक्यात सुरु झाली. मात्र या मालवाहतुकीवर इंधन दरवाढीचे संकट आले आहे. त्यामुळे आता या दरवाढीचा फटका एसटीच्या मालवाहतुकीला बसला आहे. परिणामी एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापार्‍यांना आणि शेतकर्‍यांना एसटीच्या मालवाहतुकीसाठी प्रति किमी ३८ रुपये दराने रक्कम भरावी लागणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सोसावा लागत आहे. त्यामुळे या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रात पर्दापण केले. प्रवासी गाड्यांमध्ये काही अंशी बदल करून मालवाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, गडचिरोली, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मालवाहतुकीच्या क्षेत्रात एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माफक दर, सुरक्षित आणि नियमित सेवेमुळे एसटीची मालवाहतूक दिवसेंदिवस वाढत होती. सतत सुरु असलेल्या इंधन दर वाढीमुळे महामंडळाला आता मालवाहतुकीचे दर वाढवावे लागत आहेत. त्यानूसार आता प्रति किलोमीटर दरात ३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ जुलैच्या इंधनदरात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. परिणामी इंधन खर्चात वाढ झाली. महामंडळाला दिवसाला १ लाख लिटर डिझेल लागते. डिझेल खरेदीसाठी महामंडळ वर्षाला ३ हजार कोटींची तरतूद करते. त्यापैकी २ हजार ८०० कोटी रुपये डिझेलवर खर्च होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रति किमी किमान ३८ रुपये

एकेरी जाणार्‍या मालवाहतुकीचा दर प्रति किमी किमान ३८ रुपये करण्यात आला आहे. तसेच प्रति दिवस मालवाहतुकीसाठी ३,५०० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी प्रति दिन ३ हजार रुपये भाडे होते, असे एसटीतील अधिकार्‍यांनी सांगितले. २० जुलैपूर्वी बुकिंग झालेल्या मालवाहतुकीसाठी सुधारित भाडे लागू राहणार नाही, असे महामंडळाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात एसटीच्या ३२० मालवाहतुकीच्या गाड्या आहेत. यातून खते-बियाणे, आंबे, कांदे, झाडे अशा सर्व प्रकारच्या सामानांची वाहतूक करण्यात येते.

First Published on: July 19, 2020 8:00 PM
Exit mobile version