एसटी चालकाचे प्रसंगावधान! बस चालवाताना आला हार्ट अटॅक, मृत्यूपूर्वी वाचवले २५ प्रवाशांचे प्राण

एसटी चालकाचे प्रसंगावधान! बस चालवाताना आला हार्ट अटॅक, मृत्यूपूर्वी वाचवले २५ प्रवाशांचे प्राण

एसटी चालवत असतानाच अचानक छातीत दुखू लागलं. त्यामुळे एसटी चालकाने बस बाजूला घेतली. बस बाजूला घेतल्यानंतर काहीच वेळात या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्याआधी त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तब्बल २५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. पुणे-सातारा मार्गावरची ही घटना असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (St driver died by heart attack but saved 25 passengers lives)

हेही वाचा – ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, भेटीतील चर्चेबद्दल कुतूहल

जालिंदर रंगराव पवार असं या चालकाचं नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पाळशी गावचे रहिवासी होते. बुधवारी पालघर येथून वसई आगाराची बस घेऊन म्हसवडकडे प्रवशांना घेऊन जात होते. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी प्रवास करत होते. पुणे-सातारा मार्गावर ही बस दुपारी एकच्या सुमारास पोहोचली.खेड शिवपूर टोलनाका पार केल्यानंतर एसटीचा वेग मंदावला. वेग मंदावल्याने याबाबत एसटीच्या कंडक्टरने त्याबाबत कारण विचारले. तेव्हा चालकाला चक्कर येत असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे कंडक्टरने बसचालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. बस रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर थोड्याच वेळात बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – आरे कारशेड: पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

वेळेत बस बाजूला घेतली नसती तर कदाचित मोठा अपघात होऊ शकला असता. कारण, या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती. बस सुरू असतानाच चालकाला हृदय विकाराचा झटका आला असता तर मोठा अपघात होऊ शकला असता. मात्र, दाखवलेल्या प्रसंगवाधनामुळे बसमधील प्रवाशांसह त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांचाही जीव वाचला आहे.

First Published on: August 5, 2022 11:17 AM
Exit mobile version