एसटी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये भत्ता मिळावा; महामंडळाकडे केली मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये भत्ता मिळावा; महामंडळाकडे केली मागणी

बेस्ट प्रशासनाने २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी दैनंदिन सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांना ३०० रुपये भत्ता जाहीर केला आहे. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा ५०० रुपये इतका भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. बेस्टचे कर्मचारी मुंबईत राहतात. त्यांना येण्यास बेस्ट बस उपलब्ध आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या वाहनाने कामगिरीवर यावे लागते. त्यामुळे दैनंदिन ५०० रुपये इतका भत्ता देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातून कर्तव्यावर येण्यासाठी तसेच त्यांनतर पुन्हा घरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने जवळपास ४०० बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालवण्यात येत आहेत. मात्र या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळातील काम करणारे बहुतांश कर्मचारी स्वतःच्या गावी परतले आहेत. तसेच गावातून मुंबईत यायला साधने नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून सेवा पुरवणे शक्य झालेले नाही. महामंडळाने इतर विभागातील इच्छूक चालक-वाहक यांना मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात कामगिरी करण्यासाठी बोलावले आहे.

एसटी चालक-वाहक कर्तव्य बजावण्याकरता मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना काम करतानासुद्धा अनेक अडचणी आहेत. अशा गंभीर परिस्थितीत एसटी कर्मचारी काम करत आहेत. इतकेच नाही तर मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात जे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना स्वतःच्या वाहनाने कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळानेसुद्धा ५०० रुपये इतका भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्रात ९ मिनिट चॅलेंज यशस्वी; बत्ती बंदच्या चॅलेंजला राज्याचा दुप्पट प्रतिसाद

First Published on: April 5, 2020 11:57 PM
Exit mobile version