ST worker strike: मागील २४ तासात ३,०१० कर्मचारी निलंबित, २७० कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

ST worker strike: मागील २४ तासात ३,०१० कर्मचारी निलंबित, २७० कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन अनेक दिवसांपासून सुरु आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ करण्यात यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका राज्य सरकारने घेतली असून पगारवाढ करण्यात आली आहे. परंतु अद्यापही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. एसटी महामंडळाने शनिवारी एकूण ३ हजार १० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर २७० कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस धाडली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं आहे.

परिहवन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात ही सर्वाधिक पगारवाढ असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. मात्र कर्मचारी एसटीच्या शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशा मागणीवर ठाम आहेत. पगारवाढ केल्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे आणि संप मिटवावा असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. मात्र कर्मचारी एकाच मागणीवर ठाम असल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा सुरुच ठेवला आहे. आतापर्यंत एकूण ६ हजार २७७ कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने शनिवारी ३ हजार १० कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तर एकूण १४९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस दिली आहे. गेल्या २४ तासात २४० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. राज्यातील काही बस डेपो पोलिसांच्या सुरक्षेत सुरु करण्यात आले आहेत.

अनिल परबांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून आता कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या आणखी काही मागण्या असतील तर त्या समितीसमोर ठेवाव्यात, त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल असेही अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांच्यावरील कारवाई तात्काळ रद्द करण्यात येईल असे अनिल परब यांनी सांगितले होते. परंतु कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम आहेत.


हेही वाचा : एअरपोर्टवर उतरलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन सक्तीचे, रुग्ण आढळ्यास इमारत होणार सील, पालिकेच्या गाईडलाईन्स


 

First Published on: November 27, 2021 10:01 PM
Exit mobile version