एसटीचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही – जयंत पाटील

एसटीचे कर्मचारी आमचेच; सरकार त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहत नाही – जयंत पाटील

एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत…दंगा करत आहेत…अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करत असून हे प्रश्न लवकर सुटावेत, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने ही त्यांच्या संघटनांकडून व्हायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नाही. सर्व राजकीय पक्षांनी या मर्यादा पाळल्या होत्या. परंतु भाजप ऐनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना उत्सुक नाही दिसल्यावर स्वतःच पुढे येऊन आंदोलन करायला लागले आहेत अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

भाजपच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात होत असलेली घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाही समाचार जयंत पाटील यांनी घेतला.

किती लोकांना बदनाम करुन आत टाकणार?

दोन-चार मंत्र्यांना मुद्दाम बदनाम करुन आत टाकलात तर बाकीचे आमदार आहेतच की आमच्याकडे कशाचीही कमी नाही. तुम्ही किती लोकांना बदनाम करणार? किती लोकांना आत टाकणार अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

भाजप ऐनकेन प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सरकार लवकर जावं ही भाजपची इच्छा आहे. मात्र देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करतोय. त्यामुळे सरकार बरखास्त करायचा अधिकार कुणाला नाही शिवाय चारचौघांची इच्छा असली तरी सरकार बरखास्त होवू शकत नाही असे जयंत पाटील ठणकावून सांगितले.

First Published on: November 12, 2021 6:08 PM
Exit mobile version