नभ जोरात बरसला…सुखावला बळीराजा

नभ जोरात बरसला…सुखावला बळीराजा

जून महिना सरत आला तरी समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना शनिवारी सायंकाळी तालुक्यातील विन्हेरे परिसरात जवळपास एक तास मुसळधार पाऊस पडल्याने रविवारी सकाळपासूनच शेतकरी पुन्हा आपल्या नव्या उत्साहात शेतात दाखल झाला आहे.

परिसरात संपूर्ण जून महिना बहुतांशी कडाक्याच्या उन्हाचा गेला आहे. शेतकर्‍यांनी केलेली पेरणी आणि त्यातून रुजलेले भाताची रोपे उन्हात करपतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजता कुर्ला ते विन्हेरे परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे कोरड्या पडलेल्या नाल्यांतून लाल गढूळ पाणी आले. हे पाणी महाड-विन्हेरे मार्गावर माती घेऊन आल्याने काही वेळ वाहनचालकांना देखील त्रास सहन करावा लागला.

कुर्ला आणि परिसरात पडलेल्या पावसाने भात शेतीचे उन्हाने होणारे नुकसान टळले आहे. शेतात पाणी देखील बर्‍यापैकी साचल्याने भात रोपे पुन्हा जोर धरतील, अशी आशा येथील शेतकर्‍यांनी व्यक्त केली. जून महिन्याच्या शेवटपर्यंत भात लावणी सुरू होते. मात्र, यावर्षी पावसा अभावी भाताची रोपांची अद्याप वाढ झालेली नाही. त्यामुळे भात लावणी देखील लांबण्याची शक्यता आहे. याकरिता देखील पाऊस अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या तुरळक पावसाने शेतकरी चिंतातूर आहेत. एका भागात पडलेल्या पावसाने काही शेतकरी सुखावले असले तरी अन्य भागातील शेतकरी मात्र पावसाची वाट पाहत आहेत.

शनिवारी सायंकाळी सव्वातास जोराचा पाऊस झाला. यामुळे शेतात आणि नाल्यांना देखील चांगले पाणी आले. शेतीची कामे करणे सोपे झाले आहे. पावसाने अन्य भागात देखील अशीच हजेरी लावली पाहिजे.
-प्रकाश घोले, शेतकरी, तांबडी कोंड

First Published on: June 24, 2019 4:06 AM
Exit mobile version