“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

“शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं आहे. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यता देखील अजित पवारांनी वर्तवली. दरम्यान, अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, कोरोनाचे सावट अद्याप संपलेलं नाही. टप्प्याटप्प्याने सर्व सुरु करण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाची काळजी घेत राज्याची वाटचाल सुरु आहे. कोरोनाचे संकट नसते तर दुप्पट-तिपटीने विकास कामं करून पुढे गेलो असतो. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. मात्र समान कार्यक्रमावर एकत्र आले. भाजपच्या सत्तेच्या काळात दुजाभाव होत होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. जीएसटीची रक्कम केंद्राकडे अडकून आहे. पगार, पेन्शनसाठी राज्याचे साडेबारा हजार कोटी खर्च होतात” असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी “काही लोक साहेबांना सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले” असे म्हणत अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड आणि मधुकर पिचड या पितापुत्रांवर निशाणा देखील साधला आहे. “प्राजक्त तनपुरेंना नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास अशा पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मलाही राज्यमंत्रिपद दिलं होतं, मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा. पण मला कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशी तीनच खाती होती आणि या पठ्ठ्याला बघा. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे. प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय” , असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विनोदी भाष्य केले.

First Published on: January 30, 2021 1:48 PM
Exit mobile version