मनसेचा नवा झेंडा वादात, निवडणूक आयोगाची नोटीस

मनसेचा नवा झेंडा वादात, निवडणूक आयोगाची नोटीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बहुचर्चित नवीन झेंडा आता नव्या वादात अडकला आहे. नव्या झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्राचा वापर केल्यामुळे निवडणुक आयोगाने नोटीस बजाविली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या नोटीसला आता मनसे काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही संघटनांनी निवडणुक आयोग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकत्याच आपल्या भूमिकेत बदल करीत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या नव्या भूमिकेसह नवा झेंडा मनसैनिकांच्या हाती स्वाधीन करण्यात आला. भगव्या रंगाच्या या झेंड्यात शिवरायांच्या राजमुद्रेच्या समावेश करण्यात आला आहे. या विरोधात काही दिवसांपूर्वी जय हो फाउंडेशन, संभाजी बिग्रेड आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य निवडणुक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नोटीस पाठविली आहे. निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी ही नोटीस बजाविली आहे. ५ फेब्रुवारी रोजी ही नोटीस बजाविली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अंतर्भाव राजकीय पक्षासाठी थोर व्यक्ती व चिन्हांचा गैरवापर करण्यात आल्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनसेचा हा नवा झेंडा आता वादात अडकण्याची चिन्हे आहेत.

या नोटीसीसंदर्भात बोलताना मनसेचे शिरीष सावंत यांनी वृत्तवाहिनींशी बोलताना सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने पाठविलेली नोटीस आम्हांला मिळालेली नाही. त्यांना आम्ही केंद्रीय निवडणुक आयोगाने पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविणार आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा विषय निवडणुक आयोगाच्या कक्षेत येत नाही. जर त्यांच्या अख्तारित हा विषय येत नसेल तर तो राज्य निवडणुक आयोगाच्या कक्षेत येणार नाही. देशाच्या झेंड्याबाबत जे नियम आहेत, त्यांचे सर्वांना पालन करावे लागते, त्याचा पालन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: February 12, 2020 7:58 PM
Exit mobile version