आता ‘महा मदत’ अँपद्वारे होणार दुष्काळाचे विश्लेषण

आता ‘महा मदत’ अँपद्वारे होणार दुष्काळाचे विश्लेषण

यंदा राज्यात हवातसा पाऊस न पडल्यामुळे आतापासूनच राज्यात दुष्काळाचे सावट दिसू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकार कामाला लागले असून, आता दुष्काळाचे विश्लेषण करण्यासाठी ‘महा मदत’ अँप तयार करण्यात आले आहे. या अँपचे आणि संकेतस्थळाचे आज उदघाटन महसूल, मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, माजी अपर मुख्य सचिव विजय कुमार आदी उपस्थित होते.

अँप विषयी थोडक्यात

मदत आणि पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरच्या (MRSAC) मदतीने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष ठरवून दिले आहे. या निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला जातो. या निकषांमध्ये सलग २१ दिवस कमी पर्जन्यमान, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती, भूजल पातळी आदींचा समावेश आहे. या निकषानुसार जमा झालेली माहिती या संकेतस्थळावर जमा करून त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. यामुळे अचूक विश्लेषण होऊन दुष्काळ जाहीर करून नागरिकांना तातडीने सहाय्य करण्यास मदत होणार आहे.

काय म्हणालेत चंद्रकांत पाटील

केंद्र सरकारच्या दुष्काळविषयक पहिल्या निकषानुसार राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये सलग २१ दिवस पाऊस पडलेला नाही. तसेच दुसऱ्या निकषाची पाहणी लवकरच पूर्ण होऊन सोमवारपर्यंत अहवाल येईल. त्यानंतर ज्या तालुक्यांमध्ये दोन्ही निकष पूर्ण होतील, अशा तालुक्यात दुष्काळी सदृष्य परिस्थिती जाहीर करून तातडीने विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारीस्तरावर २५ ऑक्टोंबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी तालुके जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.

First Published on: October 5, 2018 9:20 PM
Exit mobile version