राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन; ठाण्यात नाना पटोलेंची उपस्थित

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन; ठाण्यात नाना पटोलेंची उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून बदनामीकारक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुरत जिल्हा न्यायालयाकडून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर लोकसभा सचिवालयाने देखील कारवाई करत राहुल गांधी यांचे खासदारकी पद रद्द केले. या विरोधात काँग्रेस पक्षाचे देशभरातील आमदा, खासदार, नेते आणि पदाधिकारी-कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. या कारवाईविरोधात आज काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. ठाण्यात देखील काँग्रेसने भाजप सरकारविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहिले होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “ज्याप्रमाणे आमच्या नेत्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांना देखील फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्याच्याबाबत जी माहिती आमच्याकडे आली आहे, ती खूप वेगळी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची उत्तरे सरकारला द्यावीा लागणार. सरकारचा मनमानी कारभार आम्ही चालू देणार नाही.”

फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ही हुकूमशाही पद्धती आणि लोकशाहीला न माननारी व्यवस्था सुरू करू पाहणाऱ्या लोकांचे हे चेहरे आम्ही उघड पाडू आणि प्रत्येक मुद्द्यांसाठी लढाई करू, असेही या ठाण्याच्या आंदोलन स्थळावरून नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, ही हुकूमशाही प्रवृत्ती या सरकारमध्ये आली आहे का?, राज्यातील सर्व भागांचा विकास व्हावा असे असताना, एखाद्या भागाला काहीच द्यायचे नाही आणि एखाद्या भागाला सगळं काही द्यायचे. अशा पद्धतीचे चित्र या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रश्नावर सरकार नेमके काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात, देशात वाढत जाणारी महागाई आणि बेरोजगारी विरोधात भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या विरोधात देखील आंदोलन केले होते. त्यावेळी निषेध आंदोलनाला काँग्रेसचे नेते देखील उपस्थित राहिले होते.


हेही वाचा – अंबादास दानवेंनी ‘वज्रमूठ’ सभास्थळाची केली पाहणी

First Published on: March 31, 2023 2:53 PM
Exit mobile version