आज, उद्या घरीच रहा!

आज, उद्या घरीच रहा!

मुंबई महापालिकेने मंगळवारी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन लाईफसेव्हिंग बोटसह मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. (छायाः दीपक साळवी)

महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍यावर घोंघावणारे निसर्ग चक्रीवादळ हे आता उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. गेल्या काही वर्षातील वादळांपैकी हे सर्वात भीषण वादळ आहे. प्रशासन आपल्यापरीने पूर्ण सज्ज आहे. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफ, एनडीआरएफच्या तुकड्या कामाला लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून काही वेडंवाकडं पाऊल उचलण्याची गरज नाही. पुढचे काही दिवस आपण घराबाहेर पडू नका, त्यातच आपले हित असून ज्याप्रमाणे आपण करोनाच्या संकटाशी दोन हात केले, त्याप्रमाणेच आपण या वादळा देखील तोंड देऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला धीर दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदर्शनवरून राज्यातील जनतेला संबोधताना सांगितले की, राज्यातील प्रशासन वादळाच्या पार्श्वभूमीवर सज्ज आहेच. त्याशिवाय केंद्र सरकार देखील पूर्ण ताकदीनिशी राज्याच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केंद्र सरकार सोबत असल्याचे सांगितले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील केंद्राची मदत असल्याचे सांगितले. ३ जूनपासून आपण पुनःश्च हरिओम करणार होतो. मात्र आता वादळ येत असल्यामुळे निदान किनार्‍यालगत असलेल्या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सुरू केलेल्या सर्व आस्थापना बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल

हे वादळ पूर्वीच्या वादळांपेक्षा मोठे असून १०० ते १२५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मनुष्यहानी किंवा प्राणहानी होऊच नये, असा प्रयत्न आपण करणार आहोत. मागच्या दोन दिवसांत सर्व मच्छिमारांना समुद्रातून माघारी बोलावले आहे. तसेच पुढचे २ दिवस समुद्रात कुणीही जाऊ नये, असे सांगत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका, असा महत्त्वाचा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. या दोन दिवसांत दूरदर्शन किंवा रेडिओवरील बातम्यांवर लक्ष ठेवा, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असेही ते म्हणाले. तसेच बीकेसी येथे कोविड सेंटर उभे करण्यात आले होते. मात्र वादळाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन या ठिकाणच्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी
=ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांनी घराच्या आजुबाजूला सुट्या पडलेल्या वस्तू घरात आणाव्यात ज्यामुळे त्या उडणार नाहीत
=वादळामुळे काही ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित करावा लागणार आहे. नागरिकांनी मोबाईल, बॅटरी, पॉवर बँक गोष्टी चार्ज करून ठेवाव्यात.
=जिथे मोठे छप्पर किंवा शेड बांधले आहेत. तिथे तुम्ही राहू नका. कारण वादळात ती उडण्याची शक्यता आहे. विजेचा अनावश्यक वापर टाळावा.
=ग्रामीण भागात किनार्‍यालगतच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करा.
=आवश्यकतेपुरते पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा.
=मुंबईत जमावबंदीचे कलम लागू असल्याने अनावश्यक घराबाहेर पडू नका.
=चक्रीवादळाबाबत समाजमाध्यमांवर अफवा पसरवल्यास कडक कारवाई.

First Published on: June 3, 2020 6:41 AM
Exit mobile version