भाजप राज्य अधिवेशनात ठरणार आगामी निवडणुकांची रणनिती

भाजप राज्य अधिवेशनात ठरणार आगामी निवडणुकांची रणनिती

नाशिक : नाशिकमध्ये १० व ११ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनाप्रसंगी केंद्रिय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच, केंद्रातील मंत्रीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून, या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार, तसेच आगामी निवडणुकांबाबत रणनिती आखली जाणार आहे.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिवेशनाबाबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि विक्रांत पाटील यांनी माहिती दिली. दोन सत्रांत हे अधिवेशन होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सातपूर येथे सायंकाळी ६ ते ९ प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत प्रदेश पदाधिकार्‍यांच्या बैठका होतील. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे उपस्थित असतील. या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरिअर्स, सोशल मीडिया व त्याचा वापर, विधानसभा प्रवास इ. विषयांवर पदाधिकारी आढावा सादर करतील.

अधिवेशनाला केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्राचे महाराष्ट्रातील मंत्री, नामदार चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व भाजप मंत्री, हजारांहून अधिक पदाधिकारी येणार आहेत. राज्यातील खासदार, राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात राजकीय तसेच कृषी क्षेत्रासह विविध विषयांवर ठराव पारित होतील, असे चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष गिरीष पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, नाशिक ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 10, 2023 12:26 PM
Exit mobile version