राज्याला तीव्र दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी बळ दे

राज्याला तीव्र दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी बळ दे

Chandrakant Dada Patil

राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असे महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि सौ. आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरु आहे. भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल, असे पाटील यांनी सांगितले. राज्यात यंदा खूपच तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाय योजना केल्या आहेत. पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल, असे पाटील म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील श्री. मेंगाणे गेली 25 वर्षे पंढरीची वारी करतात. शेती करणार्‍या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटीचा पास देण्यात आला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचा महसूल मंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

First Published on: November 20, 2018 5:53 AM
Exit mobile version