रक्षाबंधनसाठी एसटीची विशेष वाहतूक सेवा

रक्षाबंधनसाठी एसटीची विशेष वाहतूक सेवा

एसटी महामंडळ

यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते १८ ऑगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहीत करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचा सण म्हणून ‘रक्षाबंधन’ सणाला अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे अथवा बहिण भावाकडे ओवाळण्यास जाते. साहजिकच या दिवशी प्रवासी वाहतूकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवाशी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतूकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील, असेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

यंदा १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी रक्षाबंधनाचा सण येत आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन महत्वाचे सण असल्याने सार्वजनिक सुट्टीसह प्रवाशांची ये-जा देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

First Published on: August 14, 2019 2:25 PM
Exit mobile version