सीईटी परीक्षांबाबत विद्यार्थी पालक संभ्रमात

सीईटी परीक्षांबाबत विद्यार्थी पालक संभ्रमात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणार्‍या सीईटी परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परंतु सीईटी सेलकडून परीक्षांसंदर्भात कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सप्टेंबरमध्येही परीक्षा घेणे अवघड आहे. त्यामुळे परीक्षेबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्य सरकारने परीक्षेसंदर्भातील निर्णय आठवडाभरात जाहीर करून पालक, विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेने केली आहे.

व्यवसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असते. सीईटी सेलकडून १३ व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांसाठी ६ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बारावीचा निकाल लागून अन्य अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपर्यंत सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी परीक्षेबाबत कोणतेही वेळापत्रक किंवा सूचना संकेतस्थळावर जाहीर केलेले नाही. तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ ऑगस्टपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परीक्षा कधी आणि कशा घेणार याबाबत सीईटी सेलने आठवडाभरात परिपत्रक काढून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी केली आहे.

First Published on: August 6, 2020 5:36 PM
Exit mobile version