Students Agitation: हिंदुस्तानी भाऊशी शिक्षणमंत्र्यांची भेट, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन बैठक मंगळवारी

Students Agitation: हिंदुस्तानी भाऊशी शिक्षणमंत्र्यांची भेट, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन बैठक मंगळवारी

हिंदुस्थानी भाऊला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

राज्यभरातील ठिकठिकाणीचे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आज अचानक आक्रमण झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाईन स्वरुपातच परीक्षा घेण्यात यावी यासाठी आज राज्यातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईसह नागपूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या शहरांमधील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे बिग बॉस फेम विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ असल्याचे समोर आले आहे. दरम्यान उद्या हिंदुस्तानी भाऊसोबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची बैठक होणार आहे. या बैठकीत परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत निर्णय घेऊ, असे हिंदुस्तानी भाऊने एका वृत्तवाहिनी बोलताना माहिती दिली.

हिंदुस्तानी भाऊ नेमका काय म्हणाला?

‘मी कोणत्या पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेला नाही. मी माझ्या देशासाठी जेवढं होत तेवढं करतो. तसेच माझे तरुण आणि विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागते तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी उभा राहतो. तर यावेळेस तीन महिने ट्वीटवर कॅन्सल बोर्ड एक्झाम ट्रेंड होत आहे. हे सर्व मंत्र्यांपर्यंत पोहोचत होते, तरी सुद्धा सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही. नंतर सर्वांनी मला मेसेज केला की, भाऊ तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आहोत. आम्हाला जे ऑनलाईन शिकवले जाते, ते शिक्षण पूर्ण झाले नाही. तसेच काही विद्यार्थ्यांनी आम्ही जीव देऊ वगैरे मेसेज केला आहे. त्यासाठी मी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता की, प्लिज तुम्ही या मुलांचे ऐका. मुलं तुम्हाला मेल करतायत आहेत. ट्वीटरवर ट्रेंड सुरू आहे, यांना मदत करा. जर नाही मदत केली तर सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरतील,’ असे व्हिडिओद्वारे हिंदुस्तानी भाऊने सांगितले.

आता याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हिंदुस्तानी भाऊसोबत उद्या बैठक घेणार असून यामध्ये याबाबत काहीतरी निर्णय घेऊन असे, हिंदुस्तानी भाऊने सांगितले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील गर्दी नियंत्रणात आणा, तसेच या आंदोलनामागे कोणाचा हात होता? याची चौकशी करा असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा – नाना पटोले

तसेच दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, ‘कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी आणि पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणे चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे करत काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यावर राजकारण करणे अयोग्य आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना एमपीएससीच्या परिक्षेचा मुद्दा घेऊन अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातून अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे. सरकारने शिक्षणासंदर्भात सर्व स्तरातील लोक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ यांची मते विचारात घेतलेली आहेत असे असताना विद्यार्थ्यांच्या आडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, विद्यार्थ्यांना भडकवू नका, विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष द्यावे. मविआ सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी मी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ज्या महाराष्ट्रानी विदयार्थी चळवळीतून अनेक नेते दिले आहेत तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नासाठी एका वैचारिक बैठक नसलेल्या शिवराळ माणसाच्या पाठी जावं लागत.हे गंभीर आहे.ह्याचा सर्वच राजकीय पक्षांनी गंभीर्यानी विचार करायला हवा, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. 

हेही वाचा – HSC SSC Exam : मुंबईतही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षांसाठी आक्रमक ; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज


 

First Published on: January 31, 2022 5:51 PM
Exit mobile version