#Stupidity हा ट्रेंड ट्विटरवर सुरू, मूर्खपणा हा भारतीयांना संपवणार

#Stupidity हा ट्रेंड ट्विटरवर सुरू, मूर्खपणा हा भारतीयांना संपवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता घराच्या बाल्कनीत आणि दरवाज्यात उभे राहून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवत आभार मानण्याचं आवाहन केले होते. याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. परंतु काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून गर्दी आणि थाळ्या व टाळ्या वाजवल्या. मोदींनी केलेल्या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. पण मिळालेला हा प्रतिसाद कौतुकास्पद कमी आणि भयानक जास्त होता. एकीकडे करोनाची लागण होऊ नये यासाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात असताना लोक रस्त्यावर अक्षरश: नाचत होते. यामुळे एकीकडे पाच वाजेपर्यंत जनता संचारबंदीला सकारात्मक प्रतिसाद देणारे नागरिक आणि दुसरीकडे रस्त्यावर जमलेली गर्दी असा विरोधाभास निर्माण करणारे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत असून करोनाबद्दल आपण अद्यापही जागरुक नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. ट्विटरवर तर #stupidity हा ट्रेंडच सुरु आहे.

अजूनही लोक करोनाबाबत गंभीर नाही

विशेष म्हणजे रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जनता संचारबंदीचे आवाहन करण्यात आले होते. या संचारबंदीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शहरांमधील गजबजलेल्या अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. यामुळे लोकांमध्ये करोनासंबंधी भीती आणि जनजागृती असल्याचे दिसत होते. पण संध्याकाळी पाच वाजता लोक घराबाहेर पडले आणि आपण अद्यापही करोनाबाबतीत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं.

लोकांनी घराबाहेर पडू नये

भारतात सध्या करोनाचे एकूण ३९३ रुग्ण सापडले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात १५ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही ८९ झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.

ट्विटरवर एका युजरने तर करोना नाही पण हा मूर्खपणा भारतीयांना एक दिवस नक्की संपवणार अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

एकाने तर करोना नाही तर माणूस खरा व्हायरस असल्याचं म्हटलं आहे.

First Published on: March 23, 2020 11:49 AM
Exit mobile version