राजकीय संघर्षात गुदमरल्या…विद्यार्थी संघटना !

राजकीय संघर्षात गुदमरल्या…विद्यार्थी संघटना !

विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात त्वेषाने चिडून उठणार्‍या विद्यार्थी संघटनांनी वेळोवेळी राष्ट्रहितासाठी आवाज उठवला. शिक्षणाची दिशा ठरवण्यात या संघटनांचे कुशल नेतृत्व उपयोगी ठरु लागले. इतके महत्व या संघटनांना आलेले आहे. ‘केजी टू पीजी’ पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणार्‍या विद्यार्थी संघटनांना कालांतराने राजकीय व्यासपीठही प्राप्त झाले आणि या संघटनांमधील नेतृत्वाला अधिक वाव मिळाला. ‘जेएनयू’सारख्या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी देशाला नेतृत्व मिळवून दिले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थी हिताचे कार्य केले. परंतु, राजकीय अस्थिरता किंवा संघर्षाविना राजकीय प्रवासाच्या वाटा चोखाळण्याचा मार्ग निवडण्याची पद्धत यामुळे विद्यार्थी संघटनांचे बळ गेल्या काही वर्षांत कमी झालेले दिसते. शहरातील किंवा जिल्ह्यातील संघटनांनी विद्यार्थी हितासाठी आजवर दिलेला लढा आणि त्यांची सद्यस्थिती याविषयी जाणून घेण्यासाठी ‘आपलं महानगर’ने टाकलेला हा प्रकाशझोत…

– विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कांसाठी : मनविसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यात झंझावात सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 2007 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची स्थापना झाली. आदित्य शिरोडकर हे मनविसे पहिले अध्यक्ष राहिले. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी हाताळलेला मराठी भाषेचा मुद्दा असेल किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरांमुळे शासकीय नोकरीत मराठी माणसांची टक्केवारी वाढली. नोकरीत स्थानिकांना प्राधान्य हा मुद्दा प्रथमच त्यांनी उपस्थित केला. गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात मनविसेने विद्यार्थी हिताचे सर्व विषय हाताळले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शुल्कवाढीचा, पुस्तकांच्या सक्तीचा विषय मनविसेने सोडवला. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणार्‍या विद्यापीठाचा निषेध असेल किंवा नाशिकला पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा केला. अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले. शहरातील मैदांनावर करवाढ लागू करण्याचा निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्तांनी घेतल्यानंतर मविसेने महापालिकेसमोर क्रिकेट आंदोलन केले. अशा एक ना अनेक प्रश्नांवर मनविसेने आजवर आवाज उठवला.

युवकांच्या कर्तबगारीला आकार देणे हे ‘मनविसे’चे प्रमुख ध्येय . ‘मनविसे’ने तरूणांना एकत्र आणून त्यांच्या गुणांना संधी देणार्‍या उत्तोमोत्तम कार्यक्रमांची मालिका गुंफली. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी विधायक तरूणांचा संच हवाच होता, तो निर्माण करण्याचे धाडस ‘मनविसे’ने केले. तरूण वर्गाला विकासाच्या नवनवीन वाटा उपलब्ध करूण देण्यासाठी ‘मनविसे’ सातत्याने राबत आहे. त्यामागे मनसेचे नेते राज ठाकरे यांची प्रेरणा आहे. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया’ या त्यांच्या एकाच वाक्याने युवकांची मने भारली. तमाम तरूण ‘मनविसे’च्या झेंड्याखाली एकवटला. 1 ऑगस्ट 2006 म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी ‘मनविसे’ या लोकमान्य विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. : श्याम गोहाड, जिल्हाध्यक्ष, मनविसे

– विद्यार्थ्यांसह राष्ट्रहिताला महत्व : अभाविप 

ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून आपल्या राष्ट्राला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि या स्वातंत्र्य संग्रामात तरुणाची म्हणजेच विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर या विधायक शक्तीला विधायक मार्ग मिळावा म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची 9 जुलै 1949 रोजी स्थापना झाली. ज्ञान, शील व एकता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून व्यक्तिगत चारित्र्य म्हणजेच राष्ट्रीय चारित्र्य रुजवण्याचे कार्य अभाविप अविरत करत आहे. आपल्या देशाचे नाव ’भारत’ असावे, आपली राष्ट्र भाषा हिंदी असावी व आपले राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ असावे या तीन अभाविपच्या पहिल्या मागण्या राहिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगरमंत्री सौरभ धोत्रे हे सध्या जबाबदारी सांभाळत आहेत.

आणीबाणीच्या रूपाने जे महाकाय संकट उभे राहिले असता अभाविपच्या असंख्य कार्यकत्यांनी देशभर मोहीम उभारली. छात्र शक्ती जेव्हा राष्ट्र शक्ती म्हणून अवतरते तेंव्हा समोरील निरंकुश सत्तेलाही पायउतार व्हावे लागते हे दाखवून दिले.
1990 मध्ये काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकात आतंकवाद्यांनी तिरंगा ध्वज जाळला असता ‘जहाँ हुआ तिरंगे का अपमान, वही करेंगे तिरंगे का सम्मान’ असा उदघोष करत अभाविपचे 10 हजार कार्यकर्ते कुठलिही पर्वा न करता त्या दिशेने निघाले. बांग्लादेशमधील असंख्य नागरिक भारतामध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करत आहेत, याच गंभीर समस्येच्या विरोधात देशभरातून अभाविपच्या 40 हजार कार्यकर्त्यांनी 2008 साली चिकनेक याठिकाणी जाऊन निदर्शने केली. ‘यूथ अगेंस्ट करप्शन’च्या माध्यमातून अभाविपने भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन चालवले यामध्ये 8 लक्ष विद्यार्थ्याचा सहभाग राहिला. 2002 साली दिल्लीमध्ये अभाविपच्या देशभरातून आलेल्या 75 हजार कार्यकर्त्यांनी शिक्षा व रोजगार या विषयांना घेवून रॅली केली. टीएसव्हीके, व्हीजन, थिंक इंडिया,ओसी, जिज्ञासा, विकासार्थ विद्यार्थी, सेवार्थ विद्यार्थी, राष्ट्रीय कला मंचच्या माध्यमातून काम चालू आहे.

– राष्ट्रीय स्तरावरील पहिली विद्यार्थी संघटना : एआयएसएफ 

(एआयएसएफ) या संघटनेची स्थापना 12 ऑगस्ट 1936 रोजी झाली. राष्ट्रीय पातळीवर काम करणारी ही पहिलीच विद्यार्थी संघटना आहे. स्वातंत्र्य लढ्यात या संघटनेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सिध्द प्रांतातील हेमू कलानी यांना 19 व्या वर्षी फाशी झाली. साहिल लुधयानवी, अटल बिहारी वाजपेयी यांसह राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले व्यक्तिमत्व ‘एआयएसएफ’च्या माध्यमातून घडले. अर्थात, अटल बिहारी वाजपेयी हे कालांतराने या संघटनेतून बाहेर पडले. हा इतिहास असला तरी विद्यार्थी संघटनेची ताकद त्या काळात किती होती, हे आपल्या लक्षात येते. राज्यध्यक्ष म्हणून नाशिकचे विराज देवांग हे या संघटनेची जबाबदारी सांभाळत आहेत.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्यापासून रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, शरद्रचंद्र बोस, सरोजीनी नायडू यांच्यापर्यंत असंख्य दिग्गज व्यक्तिमत्वांनी या संघटनेत आपला सहभाग नोंदवला आहे. तर कधी या संघटनेला दिशा देण्याचे काम केले. 24 राज्यांमध्ये ‘एआयएसएफ’चे काम चालते. 13 लाख सभासद सद्यस्थितीला आहेत. दर तीन वर्षांनी या संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन होते. अधिवेशनाचे टप्पे ठरलेले आहेत. महाराष्ट्रात 20 जिल्ह्यांमध्ये या विद्यार्थी संघटनेचे काम चालते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविरोधात 15 जुलै रोजी तामिळनाडू, केरळ व महाराष्ट्रात आवाज उठवण्यात आला. मूळात ‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत द्यायला हवे, अशी संघटनेची धारणा आहे. तसेच देशातील शिक्षण तज्ज्ञांच्या मते ‘पॉलिसी ऑफ एज्युकेशन’ तयार करण्याचे काम सुरु आहे. यात रोजगार हा पण मुलभूत अधिकार असायला हवा. यादृष्टीने या संघटनेचे काम सध्या सुरु आहे. ‘बनेगा’ अ‍ॅक्ट कन्याकुमारी ते पंजाबपर्यंत लाँगमार्च काढण्यात आला. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी ‘एआयएसएफ’ महिला संघटनेला बळ दिले आहे. शहरातील झोपडपट्यांमधील गरजुंना मदत करणे असेल किंवा दहावी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हातभार लावण्याचा विषय या संघटनेने मार्गी लावला. ‘एआयएसएफ’ या राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या संघटनेत विद्यार्थी नेतृत्वाला वाव आहे. त्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेतले जातात. वैचारिक मुद्यांवर विचार मांडण्याची संधी मिळत असल्याने या संघटनेविषयी विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीपासून आकर्षण राहिले आहे.

– विद्यार्थ्यांचा कणा, भारतीय विद्यार्थी सेना

‘मराठी जना, विद्यार्थी जना, कैवारी तुझी भारतीय विद्यार्थी सेना’ हा नारा देतहिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 1990 मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना झाली. राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष राहिले. युवासेनेची निर्मिती होण्यापूर्वी विद्यार्थी सेना हीच युवकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय विद्यार्थी सेनेने स्वतंत्र कमान हाती घेतली. वैभव ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी हे इतर ठिकाणी प्रोव्हिजनल प्रवेश घेतात. त्यानंतर प्रवेश रद्द करण्याच्या वेळी महाविद्यालय त्यांना प्रवेश शुल्क परत करत नाही. याविरोधात भारतीय विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरु डॉ.वासुदेव गाडे यांच्याकडे पाठपुरावा करुन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क परत करण्यास भाग पाडले. वर्षाकाठी साधारणत: 800 कोटी रुपये विद्यार्थ्यांचे वाचले, हे भारतीय विद्यार्थी सेनेचे सर्वात मोठे यश आहे. यासह विद्यार्थी हिताचे असंख्य प्रश्न या संघटनेने सोडवले. शिवसेनेला जेव्हा गरज वाटेल तेव्हा ढाल म्हणून काम करते. विद्यार्थीहितासाठी सदैव ही संघटना आग्रही असते.

– न्यायहक्कांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांचे संघटन केले आहे. केवळ संघटनात्मक बाबींपेक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. ‘केजी टू पीजी’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आहे. यामुळे जिल्हाप्रमुख असतील किंवा शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून संघटना अगदी मजबूत ठेवण्याचे काम या पक्षाने केले आहे. गौरव गोवरधने हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठापर्यंत लढा देण्याची तयारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची असते. पक्षाचे पदाधिकारी हेच विद्यापीठात प्रतिनिधीत्व करत असल्याने त्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिला आहे. संघटना मजबूत असली तरी जास्तीत जास्त विषय हाताळण्याच्या मर्यादा या संघटनेला आलेल्या दिसतात. शिक्षण विषयक धोरणांवर व्यापक पातळीवर काम करण्यासाठी संघटना करिअर मार्गदर्शन शिबीरे असतील किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेते. संघटनात्मक बांधणीवर अधिक भर आहे.

– देशातील सर्वात मोठी संघटना : एनएसयूआय

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विद्यार्थी शाखा 9 एप्रिल 1971 रोजी स्थापन करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी केरळ विद्यार्थी संघ आणि पश्चिम बंगाल राज्य छात्र परिषद यांचे विलीनीकरण करून या संघटनेची स्थापना केली. सध्या, सदस्यत्वाच्या नावनोंदणीनुसार, ‘एनएसयूआय’ही भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. नीरज कुंदन हे राष्ट्रीय अध्यक्ष तर आमीर शेख हे प्रदेशाध्यक्ष आहेत. अल्तमाश शेख हे जिल्हाध्यक्ष आहेत. वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा होते. नीट ही परीक्षा एनसीआरटीच्या धर्तीवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन मागणी कोचिंग क्लास लावणे परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनून सेवा देण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेऊन नीट परीक्षा रद्द केली. त्याधर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा या सर्व बाबींचा विचार करून एच.एस.सी. अभ्यासक्रमावर आधारित वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी एनएसयूआयने केली.

First Published on: July 25, 2022 1:56 PM
Exit mobile version