साखर कामगारांची दिवाळी गोड; पगारवाढीचा करार लागू होणार

साखर कामगारांची दिवाळी गोड; पगारवाढीचा करार लागू होणार

राज्यातील साखर कारखाना कामगारांची यंदाची दिवाळी गोड ठरली असून पगारवाढीसंदर्भात नेमण्यात आलेल्या त्रिदस्यीय समितीचा पगारवाढीचा करार लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे साखर कामगारांना भरघोस पगारवाढ मिळणार आहे, मात्र या पगारवाढीच्या करार कालावधीत कामगार आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा संप अथवा आंदोलन करून दबावतंत्राचा वापर करता येणार नाही.

राज्यातील साखर कारखाना कर्मचारी आणि कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात राज्य सरकारने त्रिदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची अमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या समितीचा निर्णय राज्यातील सर्व साखर कारखान्यांना बंधनकारक असणार असून या कराराची मुदत एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ पर्यंत राहणार आहे.

या करारान्वये अकुशल कामगार ते सुपरवायझर पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना सरसकट १२ टक्के पगारवाढ मिळणार आहे. त्याचबरोबर एप्रिल २०१९ रोजी सहा वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना एक ज्यादा पगारवाढ, १४ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दोन ज्यादा पगारवाढ तर २१ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना तीन अतिरिक्त पगारवाढ देण्यात येणार आहेत.

कामावर असताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला कारखान्यात नोकरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, अपघात किंवा आजारपणात वैद्यकीय खर्च तसेच भरपगारी रजा मिळणार आहे.

 

First Published on: October 31, 2021 9:33 PM
Exit mobile version