सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी गावात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातच एका शेतकऱ्याने व्यासपीठावरच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्याला समजावून सांगितल्यानंतर वातावरण शांत झाले.

वीजबिल थकीत नसतानाही महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे लाखो रुपयांचा ऊस जळू लागल्याने शेतकरी शिवाजी कृष्णा चितळकर तणावात होते. याच तणावातून २१ ऑगस्टला झगडेवाडीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा झाला. त्यानंतर हा प्रकार घडला. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चितळकर व्यासपीठावर अचानक येऊन म्हणाले की, ”ताई-मामा माझे शेतीचे वीज कनेक्शन कोणतीही थकबाकी नसताना तोडले. त्यामुळे लाखो रुपयांचा उभा ऊस जळू लागला आहे. आता काय करू?” असं म्हणत त्यांनी खिशातील दोर काढून फास घेण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री भरणे यांनी तातडीने पुढे होत शेतकऱ्याला थांबवलं. त्याची समजूत घातली आणि महावितरणच्या वरिष्ठांची कानउघाडणी करण्याचं आश्वासन दिलं.

महावितरण म्हणतंय, वीज पुरवठा कनेक्शन आदल्याच दिवशी जोडला

शेतकरी चितळकर यांच्याकडे २ हजार ७४० रुपये थकबाकी होती. त्यामुळे १८ १८ ऑगस्ट रोजी त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. मात्र, थकबाकी भरताच २० ऑगस्टला हा वीज पुरवठा जोडण्यात आला. मात्र, खात्री न करताच झगडेवाडीतील कार्यक्रमात त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. बारामती परिमंडलात सर्वच प्रकारातील वीज ग्राहकांकडून वसूली मोहीम वेगात सुरू आहे. याचाच भाग म्हणून चितळकरांची वीज खंडीत करण्यात आली होती.

First Published on: August 22, 2021 10:57 PM
Exit mobile version