मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवरून सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे काही नाव नाही. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १९ वर्षीय तरूणीने आपले जीवन संपवले आहे. तृष्णा तानाजी माने असे या तरूणीचे नाव असून ती उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावची रहिवासी आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये देखील उमेश आसाराम यंडाईत या वर्षाच्या तरूणाने गळफास घेऊन जीवन संपवले. १९ वर्षीय तृष्णा बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. यापूर्वी झालेल्या मराठा मोर्चामध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे तृष्णा अस्वस्थ होती. यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलत बुधवारी दुपारी विष पिऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान संध्याकाळी ६ वाजता तिचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत तृष्णावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. अखेर प्रशासनाने मध्यस्ती करत गावकऱ्यांना शांत केले. त्यानंतर गुरूवारी दुपारी २ वाजता तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नोकरी मिळत नसल्याने तरूणाची आत्महत्या

औरंगाबादच्या चिकलठाणा भागातील उमेश आसाराम यंडाईतने देखील गुरूवारी दुपारी गळफास घेऊन जीवन संपवले. पदवी घेऊनही नोकरी मिळत नसल्याने उमेशने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी उमेशने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये शिक्षण अपूर्ण राहिले. त्यात आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याचा उल्लेख आहे. दिवसेंदिवस मराठा आरक्षणाची धग आता वाढताना दिसत आहे.

७ ऑगस्टची डेडलाईन

७ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा ९ ऑगस्टपासून राज्यभरात ठिय्या आंदोलनाचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. यापूर्वीच मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मागील ८ ते १० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. गाड्या जाळण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत.

रत्नागिरी बंदची हाक

आरक्षणासाठी आक्रमक झाल्यानंतर मराठा समाजानं आज रत्नागिरी बंदची हाक दिली आहे. राज्यभरात सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू असून आता रत्नागिरी बंदची  देखील हाक देण्यात आली आहे.

सरकारचे दिग्गजांना निमंत्रण

मराठा आंदोलनाची वाढती धग पाहता सरकारने मराठा समाजातील काही दिग्गजाांशी विचारमंथन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यानंतर या सर्वांनी मराठा समाजाने शांतता राखावी, संयम राखावा असे आवाहन केले आहे.

‘आरक्षण देणारच’

दरम्यान, मराठ्यांना आरक्षण देणारच असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण मराठ्यांना देऊ. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

वाचा – महिन्याभरात मराठा आरक्षण मिळण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती

वाचा – मराठा आरक्षण; चाकणच्या आंदोलनात समाजकटंक घुसले

वाचा – मराठा आरक्षणासाठी ‘या’ आमदारानं उभारली ‘लिगल टीम’

वाचा – मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत?

First Published on: August 3, 2018 8:50 AM
Exit mobile version