नैराश्यामुळे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं

नैराश्यामुळे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं

(फोटो प्रातिनिधिक आहे)

तुमच्या मनात कधी आत्महत्येचा विचार आला का? या प्रश्नाचे उत्तर ६४ टक्के मुंबईकरांनी हो असे दिले. या उत्तरातूनच मुंबईसारख्या २४ तास धावणाऱ्या आर्थिक शहरातील तरुणांचे मनःस्वास्थ स्थिती दिसून येते. पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन संस्थेकडून १४ ते २५ वयोगटातील तरुणांमधील आत्महत्येचा विचार या विषयावर सर्व्हेक्षण घेण्यात आले. त्यावेळी आत्महत्येसारखा विचार करणाऱ्यामध्ये तरुण मंडळींचा समावेश अधिक असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

आत्महत्येचा विचार यावर सर्वेक्षण

दररोज किमान एक ते दोन आत्महत्यांची प्रकरणे पुढे येतात. त्यामुळे पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनकडून तरुणांमधील आत्महत्येचा विचार यावर सर्वेक्षण करण्यात आले. यात मुंबईसह बंगळुरु, चेन्नई या शहरांचा देखील समावेश करण्यात आला होता. जानेवारी २०१८ मध्ये १४ ते २५ या वयोगटातील मुलांना आत्महत्येवरील काही प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात मुंबईतील ७५० मुले बंगळुरुमधील ५०० मुले तर चेन्नईमधील ६५० जणांना प्रश्न विचारण्यात आले.

का करावीशी वाटते आत्महत्या?

मुले आणि जाणत्या वयातील तरुणांना सरासरी ६५ टक्के आत्महत्येबाबतची माहिती असते. आत्महत्या हा त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊ लागला आहे. तर कोणी एखाद्या व्यक्तींने आत्महत्या केल्यास ४८ टक्के जणांना आत्महत्येचा निर्णय योग्य असल्याचे वाटते. तसेच, ४७ टक्के लोकांना आत्महत्या करण्याचा विचार नैराश्य आल्यामुळे येतो, असं वाटतं. तर ४९ टक्के जणांना असहाय्यतेतून आत्महत्या करावीशी वाटते. सरासरी ४२ टक्के जणांनी आपण आत्महत्येचा विचार केला होता असल्याचे सांगितलं. तर ५८ टक्के जणांनी आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत खेद व्यक्त केला. याचाच अर्थ ४२ टक्के जण अद्यापही निराश असून भविष्यातही आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

२०१५ साली देखील असा सर्व्हे करण्यात आला होता. तसाच या वर्षीही सर्व्हे करण्यात आला. ज्यात तोंडी आणि काही लेखी प्रश्न विचारण्यात आले होते. १४ ते २५ वयोगटातील तरुणांवर हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेचा आढावा निराशाजनक आहे. शिक्षक – पालक शिवाय समाजातील जाणकारांनी तरुणांना जागरुक करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. शिवाय, वाढत्या वयातील मनाचा आपण विचार केला पाहिजे. नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येईल. जी मुलं नैराश्यवस्थेत आढळतात, त्यांना आत्महत्या निर्णयापासून परावृत्त करण्याची गरज असल्याचे सुचवण्यात आले आहे. तर, नैराश्य आणि असहाय्यता यांचा आत्महत्येशी संबंध लावण्यापासून तरुणांना दूर ठेवण्याची गरज आहे.   – स्वाती पोपट वत्स, पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्यूकेशन संस्थेच्या अध्यक्ष

First Published on: August 28, 2018 7:53 PM
Exit mobile version